देवरायांच्या संवर्धनासाठी ‘जीपीएस’च्या साह्याने मॅपिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘पुणे जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून अधिक देवराया असून, पश्‍चिम घाटात त्या सर्वाधिक आहेत. जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्‍यांमध्ये तुलनेने देवरायांची संख्या अधिक आहे. त्यांचे संवर्धन होण्यासाठी ‘जीपीएस’च्या साह्याने मॅपिंग केले जात असून, गेल्या दहा-पंधरा वर्षांत देवरायांचा झालेला ऱ्हास आणि त्याच्या संवर्धनाचे हे मॅपिंग महत्त्वाचे ठरणार आहे,’’ असे महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीच्या सदस्या डॉ. माणिक पाठक यांनी सांगितले.

‘तेर पॉलिसी सेंटर’च्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘देवराई : सद्यःस्थिती आणि संवर्धन’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी सेंटरच्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे उपस्थित होत्या. 

डॉ. पाठक म्हणाल्या, ‘‘देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेला वन. अशा जंगलाला महाराष्ट्रात देवराई, देवराहाट असे म्हटले जाते. दक्षिण कर्नाटकात देवरकडू, नागबन, नागकुडू; तर राजस्थानात जोगमाया, शरणवन, अभयस्थान या नावाने जंगल राखले जाते. ‘देवराई’ची संकल्प ही केवळ भारतातच अस्तित्वात आहे, असे नाही. तर परदेशातही जंगलाचा काही भाग अशाच पद्धतीने राखीव ठेवला जातो. तिथे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जात नाही; परंतु प्रत्येक देशांमध्ये त्या-त्या संस्कृतीशी सुसंगत असे या जंगलाला नाव देण्यात आले आहे.’’

भारतात वेगवेगळ्या नावाने देवराया आहेत, तशा जगभरातही विविध ठिकाणी याप्रकारे जंगलाचे संवर्धन केले आहे. आशिया खंडात देवरायांची परंपरा अधिक आहे. आफ्रिका, सीरिया, तुर्कस्तान, नायजेरिया येथेही अशा पद्धतीने जंगल वाचविण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

निसर्गसंपदेचा अनमोल खजिना असणाऱ्या देवराया काळाच्या ओघात पडद्याआड जात असल्याची वस्तुस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास २५० हून अधिक; तर महाराष्ट्रात दहा हजारांपेक्षा अधिक देवराया आहेत. विकास साधताना या देवराया नष्ट होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी.
- डॉ. माणिक पाठक, सदस्या, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी

Web Title: pune news God promotion mapping by GPS