दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आलेल्या दसऱ्याच्या पहिल्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद दिला. नवरात्रीत फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या पार्श्‍वभूमीवर दसऱ्याला सोनेविक्री समाधानकारक झाल्याचे सराफांनी सांगितले.

पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आलेल्या दसऱ्याच्या पहिल्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद दिला. नवरात्रीत फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या पार्श्‍वभूमीवर दसऱ्याला सोनेविक्री समाधानकारक झाल्याचे सराफांनी सांगितले.

जून महिन्यापासून जीएसटी लागू झाला आहे, सोनेखरेदी करताना खरेदीदाराला पॅन कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करण्याचे बंधन घातले गेले आहे. यामुळे दसऱ्याचा मुहूर्त कसा राहील याविषयी उत्सुकता होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची विक्री कमी झाली आहे.

वस्तुपाल रांका म्हणाले, 'नऊ दिवस सोनेखरेदीला विशेष प्रतिसाद नव्हता. मात्र, दसऱ्याच्या दिवशी दुपारनंतर ग्राहकांनी खरेदीला गर्दी केली. मोठ्या खरेदीपेक्षा छोट्या खरेदीला त्यांनी पसंती दिली. जीएसटीचा परिणाम थोड्या प्रमाणात जाणवला.'' सोनेखरेदी ही गुंतवणूक मानली जाते; परंतु दसऱ्याच्या कालावधीत ही खरेदी गुंतवणुकीपेक्षा वापराच्या दागिन्यांना अधिक असते. याबाबत अतुल अष्टेकर म्हणाले, 'ग्राहकांकडून 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची खरेदी झाली. शुद्ध सोने घेण्यापेक्षा ग्राहकांनी दागिन्यांना पसंती दिली.''

नोटाबंदी आणि जीएसटीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात मंदी आल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दसऱ्याला सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहक बाहेर पडल्याचे नमूद करत सौरभ गाडगीळ यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत सोनेविक्रीत दहा ते पंधरा टक्के इतका फरक पडल्याचे सांगितले. ""दसरा हा महिनाअखेरीला आला. तसेच, बोनसही अद्याप ग्राहकांच्या हाती पडलेला नाही, त्याचाही परिणाम खरेदीवर झाला आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

विविध प्रकारच्या डिझाइन
गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याच्या भावात विशेष बदल झाला नाही. सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. ग्राहकांच्या आवडीनुसार सर्व प्रकारच्या डिझाइन्सचे दागिने सराफांनी बाजारात आणले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रीय, बंगाली यासह हैदराबादी व दाक्षिणात्य डिझाइन्सचा वापर केलेल्या दागिन्यांचा समावेश आहे, असे मिलिंद मराठे यांनी सांगितले.

Web Title: pune news gold purchasing at dasara muhurt