गावनिहाय समजणार भूजल पातळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पुणे - अनियमित पाऊस, बेसुमार उपसा, अशास्त्रीय पद्धतीने जलसंधारणाची कामे केल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही; तसेच पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे भूगर्भजल पातळी मोठ्या प्रमाणात घटत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

पुणे - अनियमित पाऊस, बेसुमार उपसा, अशास्त्रीय पद्धतीने जलसंधारणाची कामे केल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही; तसेच पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे भूगर्भजल पातळी मोठ्या प्रमाणात घटत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

‘युनिसेफ’च्या मदतीने राज्य भूजल सर्वेक्षण विभागाचा ‘वेळसापेक्ष भूजल सर्वेक्षण’ (रिअल टाइम ग्राउंडवॉटर सर्वे) प्रकल्प नुकताच पूर्ण झाला आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे ३३ हजार ८५५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आता दैनंदिन गावनिहाय भूजलपातळी समजू शकणार आहे. त्याआधारे आता पीक घेण्याची पद्धती, जलनियोजन करता येऊ शकणार आहे. आगामी काळात मोबाईल ॲपवरही शेतकऱ्यांना गावनिहाय भूजलपातळी समजू शकणार आहे.

गावनिहाय तक्ते तयार
देशातील भूजल पातळीचे अचूक, शास्त्रीय माहिती तयार करण्याचे काम २०१४ पासून सुरू होते. ‘युनिसेफ’कडून या प्रकल्पाला १२ लाख रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले होते. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. राज्यात पहिल्यांदा प्रायोगिक पातळीवर चंद्रपूर येथील जिवती तालुक्‍यातील विहिरींची अचूक जलपातळी तक्ते तयार करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातील ३३ हजार ८५५ विहिरींचे निरीक्षण करून गावनिहाय भूजलपातळी तक्ते तयार केले आहेत.

‘महाभूजलवेध’ संकेतस्थळ
‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन्स सेंटर’चे (एमआरसॅक) नकाशे आणि ‘गुगल डिजिटल’ नकाशांच्या साह्याने राज्यातील गावनिहाय दर किलोमीटरवरील भूजलपातळी कळू शकणार आहे. शेतकऱ्यांना कूपनलिका किंवा विहीर खोदण्यासाठी, पीक घेण्यासाठी त्यांच्या गावाचा भूजल पातळी तक्ता संकेतस्थळावर; तसेच मोबाईल ॲपवर पाहता येईल. येत्या ऑक्‍टोबरपासून हे तक्ते ‘महाभूजलवेध’ संकेतस्थळावर पाहता येतील; तसेच गेल्या तीन वर्षांमधील भूजलपातळीसुद्धा कळू शकणार आहे.

ज्या त्या गावातील भूजल पातळीची अचूक माहिती शेतकऱ्यांना सांगितल्यास त्यांना पीक घेण्याचे, जलनियोजन करणे सोपे होईल. दैनंदिन किंवा आठवडानिहाय भूजलपातळी संकेतस्थळावर, मोबाईलवर पाहता येईल; तसेच ग्रामसभांमध्येही भूजल पातळीवर चर्चा करून शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येईल. शाश्‍वत पाणीवापर आणि नियोजनासाठी या प्रकल्पाचा निश्‍चित लाभ होईल. गावनिहाय भूजल पातळीवरून जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे.
- शेखर गायकवाड, संचालक, राज्य भूजल सर्वेक्षण व विकास विभाग

हे शक्‍य होणार...
शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यायचे हे ठरविता येणार
मोबाईल ॲपवरही कळणार भूजल पातळी
शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन अचूकपणे करता येणार
नगदी पिके घ्यायचे की नाही हेही ठरविता येणार

Web Title: pune news Groundwater level