‘जीएसटी’पूर्वी आॅफर्सचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू होणार असल्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे. एक वर्षापेक्षा जास्त जुन्या मालाच्या विक्रीवर कर परतावा मिळणार नसल्याने तो ‘स्टॉक’ काढण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सेल’, ‘ऑफर’ दिल्या जाऊ लागल्या आहेत. 

पुणे - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू होणार असल्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे. एक वर्षापेक्षा जास्त जुन्या मालाच्या विक्रीवर कर परतावा मिळणार नसल्याने तो ‘स्टॉक’ काढण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सेल’, ‘ऑफर’ दिल्या जाऊ लागल्या आहेत. 

जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जून महिन्यापर्यंत शिल्लक असलेला आणि एक वर्षाच्या आत खरेदी केलेला माल (स्टॉक) विकल्यानंतर त्यावर जीएसटीचा परतावा मागता येणार आहे. परंतु त्यापूर्वीच्या मालावरील कर परतावा मिळणार नाही. यामुळे एक वर्षाहून जुना स्टॉक बाहेर काढण्याचे प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू झाले आहेत. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. साखर व्यापाऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून त्यांच्याकडील शिल्लक साठा विकण्यास प्राधान्य दिले आहे. व्यापाऱ्यांकडून गरजेपुरतीच खरेदी केली जात आहे. हाच परिणाम धान्य बाजारातही दिसून येत आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कापड, वाहन विक्रीच्या क्षेत्रात हालचाली सुरू असून, ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी ‘सेल’ आणि ‘ऑफर’ दिल्या जाऊ लागल्या आहेत. 

कापड एक वर्षापेक्षा जास्त काळ शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक असते, किंबहुना ग्राहकांची आवड लक्षात घेऊन व्यापारी माल घेऊन ठेवत असतात. ‘एमआरपी’वरील किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कपड्यांचे भाव जीएसटी लागू झाल्यानंतर वाढतील. त्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे कपडे सवलतीत विकून नुकसान टाळण्याकडे व्यापाऱ्यांचा कल वाढल्याचे व्यापारी मनोज सारडा यांनी नमूद केले. 

‘‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचा ‘स्टॉक’ करू शकणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त नाही. मात्र नुकसान टाळण्यासाठी त्यांनीही ‘सेल’ सुरू केले आहेत. ते ग्राहकांना फायदेशीर ठरत आहे,’’ असे राजेश अगरवाल यांनी सांगितले. वाहनविक्रीच्या क्षेत्रातही विशेषतः चार चाकी वाहनांवर ‘ऑफर’ दिल्या जात आहेत. साडेतीनशे सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींची किंमत वाढणार असून, अधिक क्षमतेच्या दुचाकींची किंमत कमी होणार आहे. त्याचा फायदा ग्राहकांना देण्यास आताच सुरवात झाल्याचे विक्रांत जगताप यांनी नमूद केले.

‘सर्व्हर डाउन’चा अनुभव
‘स्टॉक’ क्‍लीअर करण्याची घाई सुरू असतानाच जीएसटीसाठी ‘ऑनलाइन’ नोंदणी करण्याची व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र अनेक जणांना ‘सर्व्हर डाउन’चा अनुभव येत आहे. त्यामुळे नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याकडे ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी लक्ष वेधले.

Web Title: pune news gts before offers