चिकुनगुनियाचा ‘ताप’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये चिकुनगुनियाचे २३९ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ३५ ते ४४ वयोगटातील असल्याचा निष्कर्षही पुढे आला आहे. चिकुनगुनियाचा पुरुषांना सर्वाधिक संसर्ग झाल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. 

पुणे - शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये चिकुनगुनियाचे २३९ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ३५ ते ४४ वयोगटातील असल्याचा निष्कर्षही पुढे आला आहे. चिकुनगुनियाचा पुरुषांना सर्वाधिक संसर्ग झाल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. 

शहरात डेंगीपाठोपाठ डासामुळे पसरणाऱ्या चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत प्रत्येक महिन्यात याचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, पावसाला सुरवात झाल्यापासून म्हणजे जूनपासून या रोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून दिसते. एकट्या ऑगस्टमध्ये १२८ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. त्याचे लिंग आणि वयानुसार विश्‍लेषण महापालिकेने केले आहे.  

विश्‍लेषणाचे ठळक निष्कर्ष  
पुरुषांना अधिक संसर्ग
 पाच वर्षांपर्यंतचे १४ रुग्ण आहेत. 
 ३५ ते ४४ वयोगटातील ४६ रुग्णांना चिकुनगुनियाचा संसर्ग
 मध्यम वयीन आणि बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना धोका
 सहा ते १४ वयोगटात रुग्ण संख्या समान
 चिकुनगुनियाचा संसर्ग झालेले पुरुष रुग्ण १३० आणि महिला १०९

कशामुळे चिकुनगुनिया?
चिकुनगुनिया हा ‘अरबो व्हायरस’ या विषाणूमुळे होणारा आजार आहे. एडीस इजिप्ती या डासामुळे या विषाणूंचा संसर्ग होतो.

कसा होतो संसर्ग?
एडीस इजिप्ती या डासाची मादी चावल्याने चिकुनगुनिया आजार होतो. ही डासाची मादी चिकुनगुनियाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचे रक्‍त शोषून घेते. त्यातून हा संसर्ग होतो.

हे करा
 घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून रिकामी करा.
 पाणी साठविण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवा.
 घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा.
 निरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नका.
 पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत.

Web Title: pune news health Chikungunyaa fever