पुण्यात 200 कोटी लिटरचा अभिषेक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पुणे - शहरात दीड-दोन तासांमध्ये 101 मिलिमीटर पाऊस कोसळल्याची ऐतिहासिक घटना शुक्रवारी दुपारी घडली. केवळ 90 मिनिटांमध्ये 200 कोटी लिटर पाण्याचा अभिषेक या पावसाने पुण्यावर केला. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. झाडे पडली, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, जागोजागी वाहतूक कोंडी झाली, रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले, भिंत पडली असे चित्र शुक्रवारी दुपारनंतर पुण्यात दिसत होते. 

पुणे - शहरात दीड-दोन तासांमध्ये 101 मिलिमीटर पाऊस कोसळल्याची ऐतिहासिक घटना शुक्रवारी दुपारी घडली. केवळ 90 मिनिटांमध्ये 200 कोटी लिटर पाण्याचा अभिषेक या पावसाने पुण्यावर केला. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. झाडे पडली, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, जागोजागी वाहतूक कोंडी झाली, रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले, भिंत पडली असे चित्र शुक्रवारी दुपारनंतर पुण्यात दिसत होते. 

पुण्याच्या 20 किलोमीटर परिघाममध्ये 90 मिनिटांमध्ये 101 मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्यामुळे या भागात एवढ्या कमी वेळात पडलेल्या पावसाचे पाणी हे 200 कोटी लिटर होते, अशी माहिती जलसंपादन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

शहरात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी बारापर्यंत उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. अंगातून घामाच्या धारा लागत होत्या. दुपारी एक वाजल्यानंतर आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली. दोनपर्यंत ढगांमुळे उन्हाचा चटका कमी झाला. त्यानंतर अडीच वाजेपर्यंत शहर अंधारून आले. संध्याकाळ झाल्याप्रमाणे वातावरण झाले होते. इतक्‍यात ढगांचा प्रचंड मोठा गडगडाट झाला आणि पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या या पावसाचा वेग इतका मोठा होती की, त्यामुळे रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांना आणि दुचाकीस्वारांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधीही मिळाली नाही. अगदी काही मिनिटांमध्ये रस्त्यावरील नागरिकांना पावसाने चिंब भिजवले. 

पाच वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस 
ऑक्‍टोबरमध्ये एका दिवसांमध्ये पडलेला हा गेल्या पाच वर्षांमधील सर्वांत मोठा पाऊस, अशी नोंद हवामान खात्याच्या दफ्तरी झाली आहे. 12 ऑक्‍टोबर 2011 रोजी चोवीस तासांमध्ये 105.1 मिलिमीटर पाऊस पडला होता, तर 5 ऑक्‍टोबर 2010 रोजी एका दिवसात 181.5 मिलिमीटर पाऊस कोसळला होता. मात्र, आज पडलेला 101 मिलिमीटर पाऊस अवघ्या दीड ते दोन तासांमध्ये पडल्याचे हवामान खात्यात नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली. 

शहरात सर्वत्र पाऊस 
शहराच्या मध्य वस्तीसह सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सांगवी, औंध, कात्रज, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी, नगर रस्ता अशा बहुतांश भागात पावसाचा जोर होता. वाहन चालविताना समोरचे दिसत नव्हते, इतक्‍या जोरात हा पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून दिवे लावून मोठ्या गाड्या चालताना दिसत होते. 

वाहतूक मंदावली 
शहरातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता या शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे प्रचंड वेगाने वाहत होते. रस्त्यावरून वाहणारे पावसाचे हे पाणी गुडघ्यापर्यंत वाढले होते. त्यामुळे रस्त्यात दुचाकी वाहने बंद पडत होती. त्यातून वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यातून चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते. 

का पडला एवढा पाऊस? 
शहरात वाढलेला उकाडा, हवेतील बाष्पाचे वाढलेले प्रमाण या स्थानिक वातावरणामुळे आकाशात ढगांची गर्दी झाली. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल झाले आणि जोरदार पाऊस पडला, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली. परतीच्या पावसाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचाही हा परिणाम असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

झाडे पडली 
शहरात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे 12 ते 13 झाडे पडली असल्याची माहिती अग्निशामक विभागातर्फे देण्यात आली. त्यात सहकारनगर, नागपूर चाळ, आदिनाथ सोसायटी या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आणि झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. 

पावसाचा अंदाज 
14 ऑक्‍टोबर - ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता 
15 - शहर आणि परिसरातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्‍यता 
16 - आकाश अंशतः ढगाळ राहील 

Web Title: pune news heavy rain