भूसंपादनाअभावी महामार्गांचे काम रखडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडिया) जिल्ह्यात तब्बल साडेसतरा हजार कोटींच्या महामार्गांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी साडेबारा हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, सद्यःस्थितीत साडेपाच हजार कोटींच्या कामांना सुरवातही झाली आहे; परंतु भूसंपादनाअभावी ही कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडिया) जिल्ह्यात तब्बल साडेसतरा हजार कोटींच्या महामार्गांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी साडेबारा हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, सद्यःस्थितीत साडेपाच हजार कोटींच्या कामांना सुरवातही झाली आहे; परंतु भूसंपादनाअभावी ही कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील वासुंदे, बारामती ते फलटण या 25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीनशे कोटी खर्च येणार आहे. पुणे ते नाशिक महामार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16) नाशिक फाटा सीमा ते खेड या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याचा प्रारूप आराखडादेखील तयार झाला आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 12 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच भूसंपादनाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची असणार आहे, तर "एनएचएआय'कडून 850 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

रायगड-पुणे महामार्ग आणि रायगड ते पुणे जिल्ह्यातील शिरवळ, लोणंद, सातारादरम्यान 128 किमीच्या रस्त्याचे काम होणार आहे. त्याचा "सविस्तर प्रकल्प अहवाल' (डीपीआर) तयार झाला आहे.

त्यासाठी 1 हजार 200 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 - चाकण, शिक्रापूर, चौफुला जंक्‍शन या 160 किमीच्या रस्त्यासाठी एक हजार 800 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

भीमाशंकरचा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी 138 किमीच्या एक हजार कोटी रुपयांच्या रस्त्याचा डीपीआर तयार झाला असून, त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे.

आर्थिक विकासांतर्गत सातारा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग 9 - कडेफाटा चौफुला-सोलापूर रस्ता, वाडेफाटा, लोणंद, सुपा-तळेगाव या 56 किमीच्या रस्त्याचे 448 कोटी रुपयांचे काम मंजूर झाले आहे. "महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा' (एमएसआरडीसी) कडून नगर, बारामती, फलटण महामार्गावरील नगर ते वासुंदे फाट्यापर्यंतच्या 94 किमीच्या रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुणे, मुळशी, माणगाव, माळसा यासाठी तीनशे कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाला असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई ते गोवा रस्त्याचेही काम सुरू झाले असून, त्याला मुंबई-पुणे महामार्गाला जोडण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 साठी 280 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वडगाव, कोंढवा, मंतरवाडी, लोणीकाळभोर, लोणीकंद या 45 किमीच्या 450 कोटींच्या रस्त्याचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. पुणे-सातारा रस्त्याच्या कामांमध्ये ठेकेदारांच्या काही अडचणी आहेत. हे कामदेखील येत्या सहा महिन्यांत सुरू होणार असल्याचे "एनएचएआय'च्या सूत्रांनी सांगितले आहे.

डिसेंबरमध्ये कामांना सुरवात?
जिल्ह्यातील महामार्गांच्या कामाचे "डीपीआर' तयार झाले असून, भूसंपादनासाठी निधी मिळालेला आहे. मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादन करून दिल्यास येत्या डिसेंबरमध्ये ही कामे सुरू होतील, असेही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: pune news highway work stop by land acquisition