पोटनिवडणुकीत हिमाली कांबळे विजयी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - महापालिकेच्या कोरेगाव पार्क- घोरपडी (प्रभाग 21) या प्रभागातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष -रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीच्या उमेदवार हिमाली कांबळे विजयी झाल्या. बुधवारी झालेल्या मतमोजणीमध्ये कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा साडेचार हजारहून अधिक मतांनी पराभव केला. 

पुणे - महापालिकेच्या कोरेगाव पार्क- घोरपडी (प्रभाग 21) या प्रभागातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष -रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीच्या उमेदवार हिमाली कांबळे विजयी झाल्या. बुधवारी झालेल्या मतमोजणीमध्ये कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा साडेचार हजारहून अधिक मतांनी पराभव केला. 

तत्कालीन उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अकाली निधनानंतर या प्रभागात बुधवारी पोटनिवडणूक झाली. त्याची मतमोजणी आज झाली. नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॉंग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्ष व संघटनांनीही हिमाली यांना पाठिंबा दिला होता. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला विरोध करण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरविला होता. 

येरवड्यातील लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्या फेरीत कांबळे यांना 859, तर गायकवाड यांना 521 मते होती. त्यामुळे पहिल्या फेरीतच कांबळे यांनी 338 इतके मताधिक्‍य मिळविले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत 590, तिसऱ्या फेरीत 1316 इतके मताधिक्‍य मिळवत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. तर चौथ्या फेरीत तब्बल 1862 आणि पाचव्या फेरीत 477 मतांची आघाडी मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रशांत म्हस्के यांनी 1800 मते मिळवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 

हिमाली यांना अश्रू अनावर 
विजयाची चिन्हे दिसताच हिमाली कांबळे यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे विजय होत असताना, दुसरीकडे वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या हिमाली यांना आधार देताना रिपब्लिकनच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. रिपब्लिकन व भाजपचे ध्वज हाती घेऊन आनंद साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही कांबळे यांचा विसर पडला नाही. "अमर रहे, अमर रहे, नवनाथ कांबळे अमर रहे' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी कांबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, कांबळे यांचा बालेकिल्ला असलेल्या भीमनगर वसाहतीमध्ये आणि त्यांच्या सोसायटीमध्येही हिमाली यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. 

वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार 
हिमाली कांबळे या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून, एका खासगी कंपनीमध्ये अलीकडील काळापर्यंत त्या नोकरी करीत होत्या. नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर भाजप- रिपब्लिकन नेत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी ही निवडणूक लढविली. आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली. ""माझ्या वडिलांनी जनतेची कामे करण्यास कायम प्राधान्य दिले. आपल्या प्रभागाचा विकास आणि आंबेडकरी जनतेची सेवा करण्याचे त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहे.'' अशा शब्दांत हिमाली यांनी भावना व्यक्त केली. 

एकसंध प्रचारामुळे विजय 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पक्षाचे नेते अजित पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड त्यावर दैनंदिन देखरेख करीत होते. चेतन तुपे, सुरेखा कवडे, बंडूतात्या गायकवाड, चंचला कोद्रे, वैशाली बनकर, प्रदीप गायकवाड, तसेच पक्षाचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते. राष्ट्रवादीने शेवटच्या टप्प्यात वातावरणनिर्मिती केली. परंतु, त्यांना मते मिळाली नाहीत. तर, भाजपच्या गोटात स्थानिक आमदार दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उमेश गायकवाड तसेच लता धायरकर, श्रीकांत मंत्री यांनी प्रमुख भूमिका बजावली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांनी प्रचाराचे नेटके नियोजन केले. त्याला आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तोलामोलाची साथ दिली. भाजप- आरपीआयचा प्रचार एकसंध राहिल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीवर मात करता आली अन्‌ ही सीटही टिकवता आली. 

Web Title: pune news himali kamble won