शहराला समृद्ध करणाऱ्या ऐतिहासिक वास्तू

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

ब्रिटिश सत्ता, स्वातंत्र्याची चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील घडामोडी, घटनांचे प्रमुख साक्षीदार असलेला परिसर म्हणजेच पुणे कॅंटोन्मेंट. हिरवी गर्द झाडे, नीरव शांतता, निसर्गाने समृद्ध असलेल्या या परिसराने बाहेरून आलेल्यांनाही भुरळ घातली. त्यामुळे ब्रिटिशांनी येथेच बस्तान मांडले आणि शिक्षण, प्रशिक्षण, निवास, मौजमजेपासून ते ईश्‍वराची सेवा करण्यासाठीची चर्च, मंदिरे, असे सारे काही इथे उभे राहिले. येथील लष्करी संस्था, प्रशिक्षण केंद्र आणि धार्मिक वास्तू आजही तितक्‍याच दिमाखात उभ्या आहेत. शहराच्या समृद्धीमध्ये भर घालणाऱ्या या वास्तूंचा थोडक्‍यात परिचय.

आकर्षणाचे केंद्रबिंदू ‘एम्प्रेस गार्डन’
‘एम्प्रेस गार्डन’ हे वनस्पतिशास्त्र उद्यान ब्रिटिश कालखंडापासून आजतागायत पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या सैनिकांना विश्रांती मिळावी, त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने हे उद्यान निर्माण केले होते. सैन्याच्या मनोरंजनासाठी उद्यानात ‘पोलिस बॅंड’ आपली कला सादर करत असे. आजही या ‘पोलिस बॅंड’चे स्टॅंड उद्यानात आहे. १८९२ नंतर ‘ॲग्री-हॉल्टीकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेकडे उद्यानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली होती. उद्यानामध्ये तब्बल १५० ते २०० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ वनस्पती, वेली व झाडे आहेत. सध्या या उद्यानामध्ये झाडांच्या दुर्मिळ प्रजाती, फुलझाडे आहेत. या झाडे व फुलांचे वार्षिक प्रदर्शनही भरविण्यात येते. गर्द झाडी, रंगीबेरंगी फुले, नितळ पाणी, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानास अशी या उद्यानाची वैशिष्ट्ये आहेत.

मराठा युद्ध स्मारक 
ब्रिटिशांकडून पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या लष्कराच्या सहाव्या विभागात (पूना डिव्हिजन) महाराष्ट्रातील हजारो सैनिकांनी सहभाग घेतला होता. या युद्धात त्यांनी शौर्य गाजविले. पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या १०३, १०५, १०८, १०९, ११०, ११४, ११६ या तुकड्यांसह ११७ रॉयल मराठा आणि रॉयल सॅपर्स, ग्रेनीअर्स, पायोनियर्सच्या विविध बटालियनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटिशांनी मराठा युद्ध स्मारक उभे केले. याची कोनशिला पुणे भेटीवर आलेल्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स’च्या हस्ते १९ नोव्हेंबर १९२१ ला बसविण्यात आली. लष्कर परिसरातील डॉ. कोयाजी मार्गाच्या प्रारंभी (एलफिस्टन मार्ग) आणि सध्याच्या डायमंड हॉटेलजवळील चौकात हे स्मारक आहे. १९ नोव्हेंबरला या स्मारकास ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाकडून नोव्हेंबर २०१६ मध्ये या स्मारकाची डागडुजी करून ‘लॅकर कोट’ देण्यात आले.

विधानभवन (कौन्सिल हॉल)  
पुणे स्थानकापासून अग्नेय दिशेला अर्ध्या किलोमीटरवर, कॅंटोन्मेंटच्या पश्‍चिमेस कौन्सिल हॉलची देखणी इमारत उभी आहे. कौन्सिल हॉल हा इंग्रजांचा राज्यकारभाराचा एक प्रमुख भाग होता. कौन्सिल कायदा १८६१ ला झाल्यावर कौन्सिलची पहिली सभा पुण्याला झाली होती. अनेकरंगी विटा, फरशा, दगडांनी इटालियन शैलीत ही वास्तू बांधण्यात आली आहे. जनरल फायरे या इंग्रज अधिकाऱ्याने बांधलेली ही मूळ वास्तू सरकारने विकत घेतली. याच्या बांधकामासाठी व्हेनिशियन गॉथिक शैलीचा वापर केला. चौकोनी मुख्य मनोरा, अर्धवर्तुळाकार, किल्ल्याच्या तटासारखा किंवा चर्चच्या भागासारखा दिसणारा पूर्वेकडील जिना या वास्तूचे खास वैशिष्ट्य आहे. उत्तरेकडील भिंतीत एक वर्तुळाकार, अनेकरंगी काचकाम असलेली मोठी खिडकी आहे. त्यात ‘स्टार ऑफ इंडिया’ची नक्षी रेखाटली आहे.

सेंट मेरी चर्च  
शहरातील काही जुन्या चर्चपैकी एक. इंग्रजांनी शहराच्या पूर्वेकडे घोरपडीजवळ कॅंटोन्मेंट भागात १७ जून १८२१ मध्ये या चर्चचा पाया घातला. त्या वेळी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हा मुंबईचा गव्हर्नर होता. ३ जुलै १८२५ रोजी बिशप हेबर यांनी ‘सेंट मेरी चर्च’ असे नामकरण केले. स्वातंत्र्यपूर्व काळात हे चर्च खास इंग्रजांसाठी होते. १९७१ पासून हे चर्च कोल्हापूर बिशपांच्या अधिपत्याखाली आले. कॉवेल फादर्स व बिंटेज सिस्टर्स यांनी हे चर्च चालविले. बिशप विद्यालय व मुलींसाठी ‘सेंट मेरी शाळा’ हेही या चर्चचे कार्य आहे. या चर्चची वास्तू म्हणजे इंग्रजी वास्तुकलेचा आदर्श नमुनाच आहे. चर्चच्या तीन बाजूस दोन जुळ्या खांबावर आधारित ओसऱ्या आहेत. क्रूसाच्या आकाराचे दोन मोठे हॉल हे या चर्चचे मुख्य भाग आहेत. १७ मीटर रुंद व २३ मीटर लांब हे चर्च असून, घंटेचा मनोरा २६ मीटर उंच आहे. १९८२ साली याचे मूळचे लाकडी छप्पर बदलून सिमेंटचे बसविण्यात आले. हे चर्च चौदा खांबांवर उभे आहे.

(क्रमशः)

Web Title: pune news Historical place