पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन रखडणार?

पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन रखडणार?

पुणे - लक्ष्मी रस्त्यावरील दुचाकी पार्किंगच्या जागेत पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला परिसरातील व्यापाऱ्यांनी पुन्हा जोरदार विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे महापालिकेची योजना रखडण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे वाहनचालक आणि व्यापाऱ्यांचा विरोध असला ही योजना राबविण्याच्या भूमिकेवर महापालिका ठाम आहे. पुढील दहा-पंधरा दिवसांत प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरातील परवानाधारक फेरीवाले, पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे धोरण महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सध्या लक्ष्मी रस्त्यावरील पदपथावर ठाण मांडलेल्या व्यावसायिकांचे त्याच ठिकाणी म्हणजे, पदपथालगतच पुनर्वसन करण्याचे नियोजन अतिक्रमण विभागाने केले आहे. त्यात दुचाकींची पार्किंगची सोय असलेली एक बाजू पथारी व्यावसायिकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरच पथारी व्यावसायिकांचे दुकाने थाटली जाणार असून, पहिल्या टप्प्यात शंभर व्यावसायिकांचे पुनर्वसन होणार आहे. प्रत्येक व्यावसायिकाला चार बाय दोन इतकी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडून रस्ता व पदपथाचाही वापर होणार आहे. परिणामी वाहनचालकांपाठोपाठ पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. तरीही पथारी व्यावसायिकांना ही जागा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

आधीच फेरीवाल्यांनी पदपथावर अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो असून, पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. वाहतूक कोंडीत भर पडणार आहे; तसेच पथारी व्यावसायिक आणि व्यापारी यांच्यात वाद होतील. लक्ष्मी रस्त्यावर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करू नये. मात्र तरीही महापालिकेने या निर्णयाची अमंबलजावणी केल्यास त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल.
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com