‘हायपरलूप’च्या दिशेने आणखी एक पाऊल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत ‘हायपरलूप’ प्रकल्प राबविण्यासंदर्भातील वर्जिन हायपरलूप वन (लॉस एंजेलिस) कंपनीने व्यवहार्यता अभ्यास अहवाल (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) प्राधिकरणाकडे दाखल केला आहे. त्यामध्ये या कंपनीने तीन मार्ग प्रस्तावित केले असून, या संदर्भात प्राधिकरणाच्या अभिप्रायासह हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएचे आणखी एक पाऊल पुढे पडले असल्याचे समोर आले आहे.

हायपरलूप वन हा प्रकल्प राबविण्यासाठी पीएमआरडीएकडून वर्जिन हायपरलूप वन (लॉस एंजेलिस) यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुणे-मुंबईदरम्यान हा प्रकल्प राबविण्यासाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले होते. वर्जिन हायपरलूप वन या कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण करून या संदर्भातील अहवाल पीएमआरडीएला सादर केला असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सोमवारी दिली. 

गित्ते म्हणाले, ‘‘संबंधित कंपनीकडून पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल नुकताच पीएमआरडीएकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविणे शक्‍य असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच तीन मार्ग या कंपनीकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यावर पीएमआरडीएचा अभिप्राय देऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. या गतीने प्रकल्पाचे काम मार्गी लागल्यास येत्या २०२६ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो, अशी अपेक्षा या कंपनीने या अहवालात व्यक्त केली आहे.’’

सध्या जगभरात हायपरलूपच्या चाचण्या सुरू आहेत. अबुधाबी ते दुबई या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. तसेच हायपरलूपने उत्तर लास वेगास येथे जगातील पहिली पूर्ण-स्तराची हायपरलूप चाचणी साइट विकसित केली आहे. 

जलद सार्वजनिक वाहतुकीचे व्यवहार्य साधन बनण्यासाठी उच्च घनतेची वाहतूक आवश्‍यक आहे. जी पुणे आणि मुंबई शहरांत उपलब्ध आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे शहर जोडल्यास प्रवास १४ मिनिटांत शक्‍य होईल. पुणे-मुंबई शहरांतील २ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला या प्रकल्पाचा फायदा होणार  आहे. 

काय आहे हायपरलूप यंत्रणा?  
हायपरलूप हा वाहतुकीचा एक नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्‍ट्रो-चुंबकीय प्रणोदकांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. अत्यंत जलद व थेट अशा वाहतुकीचा हा प्रकार असून, यात ताशी वेग १०८० किलोमीटर असेल. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्‍वासार्ह वाहतूक प्रणाली असून, हायस्पीड रेल सिस्टिम्सच्या खर्चाच्या दोनतृतीयांश इतक्‍या खर्चात ही यंत्रणा विकसित करण्यात येईल. या तंत्रज्ञानामुळे वाहतूक क्षेत्रात क्रांती होणार आहे. 

प्रस्तावित तीन मार्ग 
मार्ग क्रमांक १ - पुणे ते नवी मुंबई-ट्रान्सहार्बर लिंक-शिवडी-दादर
मार्ग क्रमांक २ - पुणे ते नवी मुंबई-वाशी-दादर
मार्ग क्रमांक ३ - पुणे ते वाशी-सांतक्रूज- कुर्लामार्गे दादर

Web Title: pune news Hyperloop