esakal | Pune: स्वपगारातून औषधी उद्यान उभारणीचा उपक्रम स्तुत्य : श्रीकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकांत पाटील

स्वपगारातून औषधी उद्यान उभारणीचा उपक्रम स्तुत्य : श्रीकांत पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : भारतीय लोकशाही मध्ये कायदा एकीकडे, जनता एकीकडे तर प्रशासन एकीकडे अशी जनतेची भावना झाली असून त्यापार्श्वभूमीवर इंदापूर नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जनता, अधिकारी, पदाधिकारी,कर्मचाऱ्यांना एकत्र आणून इंदापूर शहरास देशपातळीवर नेले. त्यामुळे मन, शरीर व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता यावर सर्वांनी भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कुठलेही शासकीय अनुदान न घेता वाढदिवसावर होणारा खर्च टाळून पर्यावरण संतुलनासाठी वनौषधी उद्यान श्रमदानातून उभे केले आहे. त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये नगरपरिषद सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था ,शैक्षणिक संस्था, पत्रकार, कलाकार,पेंटर ,अंगणवाडी सेविका, फोटोग्राफर, महिला बचत गट आदींचा नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, आरोग्य सभापती अनिकेत वाघ, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते सन्मानपत्र, एक रोप देवून सत्कार झाला. यावेळी शहरात ९०० झाडे लावून जगविणारे वृक्षमित्र वासुदेव शिरसट व चंद्रकांत देवकर यांचा विशेष सत्कार झाला.

हेही वाचा: बाणेर पाषाण लिंक रस्त्यासाठी नागरीकांची न्यायालयात धाव.

यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, नगरपरिषदेकडे कुठलाही निधीनसतानाआपणा सर्वांच्या सहकार्याने शहर स्वच्छ, सुंदर व हरित झाले. माझी वसुंधरा अभियानात नगरपरिषदेने सर्वांना बरोबर घेवून २० हजार हुन जास्त झाडे लावली. देशपातळीवर प्रथम येण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले, नगर परिषदेने सर्वांच्या सहकार्याने स्वच्छता व हागीणदारी मुक्त इंदापूर अभियानात लक्षवेधी यश संपादन केले. नगरपरिषदेने सन २०१८ मध्ये देशपातळीवर ४५ वा,सन २०१९ मध्ये दहावा तर २०२० मध्ये सातवा क्रमांक पटकावला असून २०२१ मध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वसुधरा संवर्धनाची शपथ अल्ताप पठाण यांनी सर्वांना दिली. यावेळी नगरसेवक जगदीश मोहिते व अतुल शेटे पाटील,इंदापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, बँक ऑफ महाराष्ट्र इंदापूर शाखाव्यवस्थापक श्रीशैल मेहेरकर, रमेश धोत्रे, जावेद शेख, गुड्डू मोमीन, हमीद आतार उपस्थित होते. स्वागत गीत प्रमोद भंडारी यांनी गायिले. सुत्रसंचलन सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी केले.

loading image
go to top