‘आयटी’ला बुस्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुण्यात आयटी उद्योग विशेषत: स्टार्टअपची संख्या वाढत आहे. या उद्योगाला चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध असलेली जागा पुरविण्यासाठी आयटी संकुलांचा पर्याय आहे. अशा संकुलांमध्ये ‘आयटी’शी संबंधित कंपन्या एकत्र येऊ शकतात. त्यातून कंपन्यांना नव्या प्रकल्पांची उभारणी करणे सहज शक्‍य होते. संकुलांमध्ये छोट्या कंपन्यांना हवी तेवढी जागा निर्माण करून देता येते. आर्थिक दृष्टीने ती परवडणारी असते.
- विनित गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर ग्रुप

पुणे - माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगातील कंपन्यांकडून खासगी माहिती तंत्रज्ञान उद्योग संकुलाच्या (आयटी टॉवर) मागणीत वाढत होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाबरोबरच (एमआयडीसी) महापालिकेच्या हद्दीत ही संकुले उभारण्याकडे व्यावसायिकांचा कल आहे. महापालिकेने गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या आठ संकुलांना परवानगी दिली असून, त्यात ‘आयटी’तील सव्वाशेहून छोट्या कंपन्यांना सामावून घेण्याचे नियोजन मांडण्यात आले आहे. 

आयटी उद्योगाला तीन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) बांधकाम करण्यास परवानगी असल्याने ‘आयटी’ पार्क आणि टॉवर उभारले जात असून, त्यात, ‘आयटी’ संबंधितही छोटे-मोठे उद्योग उभारण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या संकुलांची निर्मिती व्हावी, यासाठी बांधकाम व्यावसायिक पुढे येत असल्याचेही सांगण्यात आले. परिणामी, या उद्योगातील कंपन्यांना संकुले सोयीचे ठरत असल्याचेही निरीक्षण आहे.

आठ प्रस्तावांना मंजुरी
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘आयटी’ उद्योगाला सवलती देण्यात आल्या आहेत. या उद्योगासमोरील अडचणी जाणून घेऊन नवे माहिती-तंत्रज्ञान धोरण (आयटी पॉलिसी) तयार करण्यात आले आहे. त्यात या उद्योगाच्या वाढीसाठी वाढीव ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने घेतला. त्यामुळे जादा बांधकाम करता येत असल्याने ‘एमआयडीसी’ आणि महापालिकांकडे आयटी पार्क आणि संकुले उभारणीचे प्रस्ताव येत आहेत. आधी वर्षाला साधारणत: दोन ते तीन खासगी आयटी संकुले उभारली जात होती. पण गेल्या वर्षभरात महापालिकेने आठ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

विस्तार वाढतोय   
पुणे शहर आणि परिसरात सध्या तीन सार्वजनिक (पब्लिक) आयटी पार्क आहेत. त्यात, हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, खराडीतील युऑन आणि तळवडेतील आयटी पार्कचा समावेश आहे. तसेच सुमारे १८० खासगी आयटी पार्कला मंजुरी दिली असून, त्यातील शंभरहून अधिक आयटी पार्कचे काम पूर्ण झाले आहे. तर ५५ आयटी टॉवर आहेत. आयटी पार्क आणि संकुलात आयटीसाठी ६० टक्के आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांना ४० टक्के जागेचा वापर करण्याची परवानगी आहे.

Web Title: pune news it company