esakal | जांभूळवाडी, कोळेवाडीत गॅस गाडीची प्रतीक्षा ; सिलिंडरसाठी करावी लागते वणवण

बोलून बातमी शोधा

जांभूळवाडी, कोळेवाडीत गॅस गाडीची प्रतीक्षा ; सिलिंडरसाठी करावी लागते वणवण
जांभूळवाडी, कोळेवाडीत गॅस गाडीची प्रतीक्षा ; सिलिंडरसाठी करावी लागते वणवण
sakal_logo
By
किशोर गरड

दत्तनगर : जांभूळवाडी, कोळेवाडी येथील ग्रामस्थांना गॅस सिलिंडर घेण्यासाठी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. यानिमित्ताने, शासनाने घालून दिलेल्या संचारबंदीच्या निर्बंधाचा फज्जा उडताना दिसतो आहे. जांभूळवाडी, कोळेवाडीतील ग्रामस्थांना भारत गॅसची राजाराम गॅस एजन्सी सिलिंडर वितरित करते. परंतु, सदरील गावांमध्ये घरपोच सिलिंडर न मिळता गावांपासून अंतरावर असणाऱ्या दरीपुलाखालून सिलिंडर न्यावा लागतो आहे. शिवाय सिलिंडरच्या किमतीपेक्षा जास्त पैसे एजन्सीकडून कडून वसुल केले जात असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.

दरम्यान कोळेवाडीतील रहिवाशांना सिलिंडर घेण्यासाठी जांभूळवाडीत यावे लागते. परंतु सध्या गॅसगाडी जांभूळवाडीतही येत नसल्याने त्यांना चार किलोमीटरचे अंतर कापून दरीपुलापासून सिलिंडर घ्यावा लागतो आहे. गेल्या लॉकडॉउनमध्ये गॅसगाडी कोळेवाडीत यावी असा अर्ज एजन्सीला ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर, एक महिना गॅसगाडी गावाजवळ येत होती. मात्र गावात गॅसगाडी आली नाही. शिवाय गॅसगाडी इकडे येणे बंद झाले असे ग्रामस्थांनी सांगितले. तर गॅसगाडी कोळवाडीत येणार असेल तर आम्ही अतिरिक्त पैसेही एजन्सीला देऊ असेही ग्रामस्थ सांगत आहेत. जांभूळवाडीतील रहिवाशांनाही सिलिंडरसाठी अर्धा ते एक किलोमीटरचा फटका बसतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दिशेने संचारबंदी केली आहे. परंतु, गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागते आहे.

हेही वाचा: पुण्यात पावसाची अचानक हजेरी; कडकडाटासह गारांची बरसात

आठवड्यातील फक्त गुरुवारी गॅसगाडी गावामध्ये येत होती तीही आता येत नाही. त्यामुळे, ग्रामस्थांचे हाल होतात. उज्वला योजने अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांनीही गॅस सिलिंडर घेतले असले. तरी एजन्सीकडून सिलिंडरचा वेळेत पुरवठा होत नसल्याने गृहिणींना पुन्हा चुली पेटावाव्या लागणार की काय अशी संभ्रमावस्था जांभूळवाडी कोळेवाडी मध्ये निर्माण झाली आहे.

'गॅस एजन्सीकडून मागणी तितका पुरवठा होत नसल्याने गावातील नागरिक हैराण झाले आहेत. कोरोना नियमाचे उल्लंघन यामुळे होते आहे.अतिरिक्त पैसा आणि वेळ वाया जातो आहे.एजन्सीने नागरिकांचा अंत पाहू नये.

- नितीन जांभळेपाटील, सामाजिक कार्यकर्ते

'जांभूळवाडीत गुरुवारी व रविवारी गाडी पाठविण्याची व्यवस्था करतो. कोळेवाडीला गाडी सुरु केली होती. परंतु गावाजवळ तीव्र चढ असल्याने एका गाडीचा अपघात झाला होता त्यामुळे सध्या तेथील गाडी बंद केली आहे. नागरिकांना अडचण आल्यास तात्काळ एजन्सीला संपर्क साधावा.'

- श्रवण जाजू, वितरक, राजाराम गॅस एजन्सी.