गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटेपासून भाविकांची गर्दी, परिसरास यात्रेचे स्वरूप.

जुन्नर : अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (मंगळवार) अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. अंगारकी संकष्टी चतुर्थीमुळे लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे यांनी दिली.

देवस्थानच्या वतीने दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. पहाटे ४.०० वा. देवस्थानचे विश्वस्त कैलास लोखंडे यांच्या हस्ते भाविकांच्या उपस्थितीत श्रीं ना विधीवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर पूजा व आरती झाली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते.

अंगारकी चतुर्थीमुळे  दिवसभर मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होती. देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे, सेक्रेटरी गोविंदराव मेहेर, खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे,प्रभाकर जाधव व कार्यलयीन सचिव रोहिदास बिडवई उपस्थित होते, दिवसभर पुणे,नगर,मुंबई,ठाणे,नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते.

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या.  सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  रात्री 9.13 वा. गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news junnar girijatmaj ganesh darshan