पोलिस व माजी सैनिकाच्या तत्परतेमुळे रात्री नदीत अडकलेल्या तिघांना मिळाले जीवदान

दत्ता म्हसकर
सोमवार, 24 जुलै 2017

आज पहाटे ३ वाजताची घटना

जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कुकडी नदीच्या पात्रातील पाणी रात्री अचानकच वाढले.

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पुणे नाशिक राज्य मार्गावरील कुकडी नदीवरील पुलाच्या पात्रातील मध्यभागी असलेल्या पीलरच्या कट्यावर भिवा हरिभाऊ दुधवडे (वय 50), त्यांची मुलगी पूजा (10), पत्नी पुष्पा (40) हे कुटुंब पावसात छताचा आधार व रात्रीचा आश्रय मिळावा यासाठी येथे झोपले होते. मात्र, पावसामुळे कुकडी नदीच्या पात्रातील पाणी रात्री अचानकच वाढल्याने ते रात्रीचे पुराच्या पाण्यात निर्जन ठिकाणी अडकून पडले. मात्र, बॅटरीच्या प्रकाशात ते दिसल्यावर एकाने ते कळवताच पोलिस आणि माजी सैनिकाने निकराचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले. या निमित्ताने अक्षय कुमारच्या 'हॉलिडे' चित्रपटाप्रमाणे समाजाच्या मदतीला धावून जाण्यास सदैव तत्पर असलेल्या या पोलिसांनी व माजी सैनिकाने 'सोल्जर इज नेव्हर ऑन हॉलिडे' या प्रत्यय दिला.

दुधवडे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अकोले येथील आहे. त्यांचं स्वतःचं घर नाही. मजुरी करून पोट भरणे व मिळालेल्या जन्माची मृत्यूपर्यंत वाट पहावी असा मनात विचार करत झोपले होते. एक एक दिवस याच पद्धतीने जगत आहे. मुलगी दहा वर्षांची परंतु परिस्थितीमुळे शिक्षणासून दूर... पत्नी पण अडाणीच व दुधवडे यांचे पण शिक्षण नाही. काय करणार मोलमजुरी सोडून हे, आणि याचमुळे नदीला आपण झोपलोय या ठिकाणी पाणी येऊन जीव धोक्यात येईल हा विचारच त्यांनी केला नाही. 

जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कुकडी नदीच्या पात्रातील पाणी रात्री अचानकच वाढले. यांना तेथून बाहेर पडणे शक्य झाले नाही. खुप आरडाओरडा त्यांनी केली परंतु काहीच उत्तर कुणी देईना. नदीच्या पाण्याचा खळखळाट व निर्मनुष्य जागा. कोण जाणार तेथे व कसा अवाज ऐकू येईल कुणाला... सुरज गजानन चौगुले हा रात्री लघुशंका करण्यासाठी पुलाच्या कोपर्‍यावर थांबला. नदीपात्रात त्याला बॅटरी चमकताना दिसली. एवढ्या पाण्यात मध्यभागी बॅटरी का चमकते पाहून त्याला शंका आली. म्हणून तो खाली उतरला तर तोही घाबरला. चारही बाजूंनी वेगवान वाहणाऱ्या पाण्यात हे तिघे अडकले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. सूरजने पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

नारायणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी जगताप आज जुन्नर तालुक्यात सेक्टर ड्युटीवर होते. त्यांना हा मेसेज वायरलेसद्वारे देण्यात येत असताना जुन्नरचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी ऐकला. ते पण रात्री गस्तीवरच होते. घोडके यांना राहवलं नाही व रात्री बरोबर 3:15 वाजता खरमाळे यांना काॅल केला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक रमेश खरमाळे जुन्नरमध्येच होते. पिंपळवंडी येथे पाण्यात तीनजण अडकले आहेत, असे घोडके यांनी खरमाळेंना सांगून मदतीला येण्याचे आवाहन केले. खरमाळे यांनी लगेच होकार दिला व दहा मीनिटांतच ते पिंपळवंडीकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत दोरखंड वगैरे साहित्य होतेच.

खरमाळे म्हणाले, "तीन जिवांचा प्रश्न होता म्हणून मी लगेच जितेंद्रजी देशमुख व विनायकजी खोत यांना फोन केला. घटनास्थळी परिस्थिती कशी आहे हे माहीत नसल्याने तिचा मी पुढे जाऊन आढावा घेतो व लगेच आपणास कळवतो. म्हणजे आपणास लागणारे साहित्य काय हवे ते लक्षात येईल, असे देशमुख बोलले व ते घेऊन आम्ही लगेच येऊ असे त्यांनी सांगितले."

दरम्यान, घोडके यांनी जगताप यांना फोन करून आधार दिला व म्हणाले "मी व मेजर खरमाळे जुन्नरहून साहित्य घेऊन निघालोय. काळजी करू नका." तोपर्यंत खमराळे व सहकारी घटनास्थळी पोचले. आळे फाट्यावरून क्रेन बोलावले होते. ते तिथे सज्ज होते.

खरमाळे यांनी 'सकाळ;शी बोलताना सांगितले की, पहिला मी सर्च केला की नदीच्या पात्रातील वाहत्या पाण्यातून त्यांना बाहेर काढता येईल का? याचा मी आढावा घेतला. परंतु पाण्याचा वेग खूपच होता व खूप मोठी जोखीम होती. क्रेनने खाली उतरून त्यांना वर काढणे सोपे होते. सूरज प्रथम क्रेनने खाली उतरला. पुष्पा यांना प्रथम वर घेतले. नंतर मी खाली उतरलो. ती दहा वर्षांची चिमुरडी भीतीने व थंडीने कापत होती. खूप घाबरलेली होती. तिला खूप आधार दिला. बेल्टवर तिला खूप जखडून बांधले. जेणेकरून तिचा हात सुटला, भीतीने चक्कर आली तरी ती सुरक्षित रहावी. तिलाही काढण्यात यशस्वी झालो. नंतर वडिलांना त्यांच्याजवळील सामानासोबत वर काढले. सूरजही वर चढला व नंतर मी वर गेलो. अशा पद्धतीने या तीन जिवांची सुटका झाल्यावर रोखून धरलेला श्वास आम्ही सोडला. मी सुरज व पोलिस निरीक्षक घोडके यांचे आभार व्यक्त करतो की आपण अतिदक्षता घेत या तीन जीवांच्या मदतीला धावून आलात व या कार्यात मला एक छोटी सहभागाची संधी दिलीत. जगताप व आळेफाटा क्रेन सर्विस यांनी कोणत्याही प्रकारे विलंब न करता येथे तत्पर सेवेस हजर होऊन उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन करतो. समाजाची अशी सेवा करताना खूप समाधान मला मिळाले. आपणही समाजासाठी समर्पितपणे मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: pune news junnar police ex-serviceman saves three lives in kukadi river