रुग्णांनो, बेडशीट घरून आणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे - रुग्णाच्या खाटेवर टाकण्यासाठी घरातून बेडशीट आणायला लावत असल्याचा संतापजनक प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडत असल्याची माहिती येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी दिली. ‘बेडशीट पाहिजे असेल तर घरातून आणा,’ अशा शब्दांत येथील कर्मचारी रुग्णांची ‘सेवा’ करत असल्याचे दृश्‍य रविवारी येथे दिसले.

पुणे - रुग्णाच्या खाटेवर टाकण्यासाठी घरातून बेडशीट आणायला लावत असल्याचा संतापजनक प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडत असल्याची माहिती येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी दिली. ‘बेडशीट पाहिजे असेल तर घरातून आणा,’ अशा शब्दांत येथील कर्मचारी रुग्णांची ‘सेवा’ करत असल्याचे दृश्‍य रविवारी येथे दिसले.

अशक्तपणा आल्याने आणि रक्तदाब खालावल्याने एका महिलेला तातडीने कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला येथील डॉक्‍टरांनी दिला. त्यानुसार त्यांना रुग्णालयातील १८ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्या वेळी तेथे दाखल झालेल्या रुग्णांच्या खाटेवर वेगवेगळ्या रंगांची बेडशीट दिसत होती. पण या महिलेला दिलेल्या खाटेवर बेडशीट नव्हते. तेथील कर्मचाऱ्यांकडे बेडशीटची मागणी केली असता, त्यांनी बेडशीट नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.

बेडशीट का नाही, रुग्णाने गादीवर झोपायचे का, अशा प्रश्‍नांची सरबत्ती रुग्णाच्या नातेवाइकांनी सुरू केली. यावर तेथील कर्मचाऱ्याने ‘बेडशीट धुवायला दिल्या आहेत. त्या यायला उशीर लागेल. त्यामुळे तुम्हाला बेडशीट पाहिजे असेल तर घरातून आणा,’ असे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकाने ‘सकाळ’शी संपर्क साधला. या पार्श्‍वभूमीवर कमला नेहरू रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता, येथील पायाभूत सुविधांबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. समीर गायकवाड म्हणाले, ‘‘रुग्णाला दाखल करताना पांढरे बेडशीट होते. ते खराब झाल्याने बदलण्याची विनंती केली. एकदा दिलेले बेडशीट खराब केले आहे. आता दुसरे मिळणार नाही. तुम्हाला घरातून आणावे लागेल, असे सांगण्यात आले.’’

मंगला सोनवणे म्हणाल्या, ‘‘प्रसूतीसाठी दाखल केलेल्या मुलीच्या खाटेवर बेडशीट नव्हती. ते घरातून आणून टाकले आहे.’’

रुग्णालयात मुबलक बेडशीट आहेत. त्या वेळेत धुऊन येतात. त्याचा साठाही आहे. इतर रुग्णालयांना काही वेळेस या रुग्णालयातून बेडशीट दिल्या जातात. बेडशीट न देण्याचा प्रकार घडला असेल, तर रुग्णाच्या नातेवाइकांनी तशी लेखी तक्रार द्यावी. संबंधितांची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल.
- डॉ. राहुल गागरे, वैद्यकीय अधीक्षक, कमला नेहरू रुग्णालय

Web Title: pune news kamla nehru hospital