कुलकर्णी दांपत्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शनिवारी (ता. 4) सुनावणी होणार आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, कोणाचीही फसवणूक केली नाही, असा दावा या अर्जात त्यांनी केला आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कुलकर्णी दांपत्याविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणी कुलकर्णी दांपत्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ऍड. श्रीकांत शिवदे आणि ऍड. गिरीश कुलकर्णी यांनी हा अर्ज दाखल केला असून, त्यावरील सुनावणी उद्या होणार आहे. डीएसके ग्रुप ऑफ कंपनीचे डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा अर्जात केला आहे.

बांधकाम व्यवसाय क्षेत्रात असलेल्या या कंपनीचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले आहे. नैसर्गिक आत्पकालीन घटनांच्या वेळी कंपनीने सढळ हाताने मदत केली आहे. या कंपनीने 1980 पासून त्यांच्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांना व्याजासह पैसे वेळोवेळी परत दिले आहेत.

कंपनीचा नावलौकिक पाहून अनेकांनी यात गुंतवणूक केली. विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) कंपनीने 300 एकर जमीन घेतली. या ठिकाणी इस्राईलमधील एका कंपनीबरोबर हिरे तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचे नियोजन होते. युरोपियन बाजारात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम इस्राईलमधील कंपनीवर झाला. या कंपनीने "डीएसके' यांच्याबरोबर पुढील व्यवहार केला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला. "ड्रीम सिटी' नावाच्या गृहप्रकल्पात कंपनीने 100 कोटींची गुंतवणूक केली. बांधकाम क्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीचा फटका या प्रकल्पाला बसला आहे. याच काळात कुलकर्णी यांचा अपघातही झाला होता. अशा विविध कारणांमुळे कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे, असा दावा अर्जात केला आहे.

या गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांच्या गुंतवणुकीपैकी केवळ दीड लाख रुपये देणे बाकी आहे. कोणाचीही फसवणूक करण्याचा हेतू कंपनीचा नाही. सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. "डीएसके' यांनी त्यांचा पासपोर्ट(पारपत्र)देखील स्वत:हून पोलिसांकडे जमा केले असल्याचे ऍड. कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: pune news kulkarni couple Application for anticipatory bail