लावणीवर थिरकली महिलांची पावले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - महिलांनी वाजविलेल्या शिट्ट्या, टाळ्या अन जल्लोषपूर्ण आवाज बालगंधर्व रंगमंदिरात दुमदुमत होता. "या रावजी, बसा भावजी', "माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावला गं', "झाल्या तिन्ही सांजा', "मला जाऊ द्या ना घरी', "विचार हाये पक्का', यांसारख्या रंगतदार लावण्या रंगमंचावर एका पाठोपाठ सादर होत होत्या अन ढोलकीचा कडकडाटही घुमत होता. 

निमित्त होते बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभानिमित्त बालगंधर्व परिवाराने आयोजित केलेल्या "लावणी महोत्सव- लेडीज स्पेशल' या कार्यक्रमाचे. माया खुटेगावकर, पूनम कुडाळकर, साधना पुणेकर आदींनी निरनिराळ्या लावण्या पेश केल्या. त्याचप्रमाणे प्रेक्षकांपैकी ज्येष्ठ महिलांना मंचावर आमंत्रित करून त्यांच्यासोबत "झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर कलावंतांनी नृत्य केले. त्याला वन्समोअर मिळाल्याने "शांताबाई' या गाण्यावर पुन्हा ज्येष्ठ महिलांनी नृत्य केले. ते पाहून तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहातील महिला उभ्या राहिल्या आणि बिनधास्त नाचू लागल्या. कार्यक्रमाची रंगत शिगेला पोचलेली असतानाच अभिनेत्री पूजा पवार, किशोरी शहाणे-विज व बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते विविध कलावंतांना पुरस्कार देण्यात आले. संतोष चोरडिया व योगेश सुपेकर यांनी निवेदन केले. 

दृष्टिहीन सोनालीला दाद 
"एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज' ही लावणी दृष्टिहीन सोनाली कदम हिने सादर करताच श्रोत्यांनी तिला जोरदार दाद दिली. पुण्यातील मुलींच्या अंधशाळेत शिकणाऱ्या सोनालीच्या गायनगुरू भावना साबडे या वेळी उपस्थित होत्या. त्यांना तिने लावणी संपल्यानंतर साद घालताच त्या भावुक झाल्या.

Web Title: pune news lavani women