वकिलाला न्यायालयातच मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
पुणे - वकिलाला न्यायालयातच धमकावण्याचा, मारहाण व शिवीगाळ करण्याचा प्रकार एका माजी नगरसेवकाने बुधवारी केला. त्याने रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे संबंधित वकिलाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
पुणे - वकिलाला न्यायालयातच धमकावण्याचा, मारहाण व शिवीगाळ करण्याचा प्रकार एका माजी नगरसेवकाने बुधवारी केला. त्याने रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे संबंधित वकिलाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

लघुवाद न्यायालयात सुनील काशिनाथ मोहोळ आणि नामदेव यमाजी मोहोळ यांच्यात दिवाणी दावा सुरू आहे. या दाव्यात ऍड. राजेंद्र दत्तात्रेय विटणकर (वय 63, रा. कर्वेनगर) हे सुनील मोहोळ यांची बाजू मांडत आहेत. या दाव्यात माजी नगरसेवक कैलास गायकवाड हे पाचव्या क्रमांकाचे प्रतिवादी आहेत.

बुधवारी दाव्याची सुनावणी सुरू असताना ऍड. विटणकर यांनी गायकवाड यांची उलटतपासणी घेतली. मुठा गावातील जमीन खरेदीसंदर्भात विटणकर यांनी प्रश्‍न विचारल्याचा गायकवाड यांना राग आला. त्यांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात असतानाच, "तू मला ओळखत नाही का, तुझ्याकडे बघून घेतो, बाहेर चल,' अशा शब्दांत धमकावले.

उलटतपासणी आणि सुनावणीचे काम संपल्यानंतर ऍड. विटणकर न्यायालयाबाहेर आले. तेव्हा गायकवाड आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी ऍड. विटणकर यांच्या कॉलरला आणि दंडाला धरून ओढत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर नेले. तेथे त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. या मारहाणीत त्यांचा चष्मा फुटून डोळ्याला इजा झाली. गायकवाड यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर रोखून विटणकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या साथीदारांनी ऍड. विटणकर यांच्या खिशातून पंधरा हजार रुपये काढून घेतले. त्यांना गाडीत जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. या वेळी वकील आणि पक्षकार जमल्याने ते त्यांना तेथेच सोडून पळून गेले.

या प्रकाराने न्यायालयात मोठी खळबळ उडाली होती. पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ वकिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी ऍड. विटणकर यांची विचारपूस केली. या प्रकरणी ऍड. विटणकर यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे.

वकीलपत्र घेऊ नका
अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचा वकिली व्यवसाय करणाऱ्या ऍड. विटणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पुणे बार असोसिएशनने निषेध केला आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही वकिलाने गायकवाड याचे वकीलपत्र घेऊ नये, असा ठराव असोसिएशनने मंजूर केला आहे.

Web Title: pune news lawyer beating in court