‘एलईडी’ दुभाजक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

अपघात रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

पुणे - पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक रस्ते आणि चौकांमधील दुभाजकांना ‘इल्युमिनेट कर्व्हिंग’ अर्थात ‘एलईडी लाइट’ बसविण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येईल आणि अपघात टळेल, अशी आशा आहे. पुढील टप्प्यात चाळीस रस्ते आणि चौकांमधील दुभाजकांना ते लावण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पदपथालाही ‘एलईडी’ बसविले आहेत.

अपघात रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

पुणे - पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक रस्ते आणि चौकांमधील दुभाजकांना ‘इल्युमिनेट कर्व्हिंग’ अर्थात ‘एलईडी लाइट’ बसविण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येईल आणि अपघात टळेल, अशी आशा आहे. पुढील टप्प्यात चाळीस रस्ते आणि चौकांमधील दुभाजकांना ते लावण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पदपथालाही ‘एलईडी’ बसविले आहेत.

शहर आणि उपनगरांमधील विविध रस्त्यांवरील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. काही भागांतील दुभाजक कमी-अधिक उंचीचे आहेत, त्यामुळे वाहनचालकांना दुभाजक दिसतच नसल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. चालकाला अंदाज न आल्याने काही वाहने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला जात असल्याचे दिसून आले आहे. तसेच, पदपथाला धडकून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले असून, पादचाऱ्यांची सुरक्षितता देखील धोक्‍यात आल्याचे एका पाहणीतून आढळून आले आहे. 

दुभाजकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून, दुभाजकांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. विशेषत: सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी अशा घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर दुभाजक असल्याचा अंदाज वाहनचालकांना यावा, यासाठी दुभाजकाच्या तळाला ‘एलईडी’ बसविण्याचे नियोजन महापालिकेच्या पथ विभागाने केले आहे.

सुरवातीला, शेवटी तळात दिवे
ज्या भागातील रस्ते आणि चौकांत अंधारामुळे दुभाजक दिसत नाहीत, अशा दुभाजकाच्या सुरवातीला आणि शेवटी तळात एलईडी बसविण्यात येणार आहे. वळण असलेल्या चौकांमधील दुभाजक आणि पदपथांवरही दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वळताना वाहनचालकांना सावधगिरी बाळगता येईल, असे पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

नागरिकांच्या सूचना जाणून घेणार
प्रायोगिक तत्त्वावर पादचारी आणि वाहनचालकांची वर्दळ असलेल्या मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकातील पदपथाला हे दिवे बसविले आहेत. त्याबाबत नागरिकांच्या सूचना जाणून घेऊन त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

शहरातील काही रस्त्यांवरील दुभाजक दिसत नसल्याने अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून, पदपथाला ‘एलईडी’ दिवे बसविले जात आहेत. बहुतेक भागांतील पदपथ आणि दुभाजकांना ते बसविण्यात येतील. नागरिकांची मते जाणून घेऊन ही कामे केली जातील.
- राजेंद्र राऊत, प्रमुख, पथ विभाग

Web Title: pune news led devider