

पुणे - समाविष्ट २३ गावात सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी पुणे महापालिकेने १३८४ कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. एकाच वेळी एवढा मोठा निधी उपलब्ध करणे शक्य नसल्याने महापालिका या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी बँकेकडून ५३० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने जुलै २०२१ मध्ये शहराच्या हद्दीलगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतर्फे या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत अशी नागरिकांकडून कायम ओरड आहे. या भागात झपाट्याने वाढणारे बांधकाम, लोकसंख्या यामुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. २०१७ मध्ये महापालिकेत ११ गावे समाविष्ट करण्यात आली. तेथे सांडपाणी वाहिनी व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प याचा ३९२ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. २०२५ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षीत आहे.
दरम्यान २३ गावे शहरात आल्यानंतर त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा इसवीसन २०५४ पर्यंतची लोकसंख्यावाढ गृहीत धरून केला आहे. यामध्ये एकूण ४७१ किलोमीटरच्या सांडपाणी वाहिन्यांचे जाळे असेल. त्याला सोडणारे मुख्य सांडपाणी वाहिन्या या ९०.५२ किलोमीटर लांबीच्या असतील. यासाठी तब्बल ९२२.६५ कोटीचा खर्च आहे. तर म्हाळुंगे, पिसोळी, नांदेड, होळकरवाडी, वाघोली, मांजरी, गुजर निंबाळकरवाडी असे २०१ एमएलडीचे क्षमतेचे सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असणार आहेत. त्याचा खर्च ४५०.७३ कोटी रुपये इतका असेल. यासह इतर कामे असे मिळून १३८४.१२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.
हा प्रकल्प मोठा असल्याने ज्या भागातील जागा लवकर ताब्यात येणार आहेत, तेथे कर्ज काढून काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मांजरी आणि म्हाळुंगे या दोन ठिकाणच्या जागा ताब्यात मिळणार आहेत. हा प्रकल्प एकूण १३८४ कोटीचा असला तरी पहिल्या टप्प्यात ५३० कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी बँकांकडून कर्जासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. जी बँक कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देईल, त्यांच्याकडून कर्ज घेतले जाणार आहे.
असा असेल पहिला टप्पा
बावधन, नऱ्हे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, म्हाळुंगे, सूस, मांजरी, शेवाळवाडी
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प - म्हाळुंगे ३८ एमएलडी, मांजरी ४५ एमएलडी
सांडपाणी वाहिनी लांबी - १९८.६० किलोमीटर
मुख्य सांडपाणी वाहिनी लांबी - ३२.५० किलोमीटर
एकूण -खर्च ५४३.७७ कोटी
‘‘समाविष्ट २३ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प केला जाणार आहे. त्याचा एकूण खर्च १३८४ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध झाल्याने ५३० कोटीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी बँकांकडून कर्जाचे प्रस्ताव मागविण्यात येणार आहे.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.