रद्द लोकलला ‘पॅसेंजर’चा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

पुणे - प्रवाशांअभावी रिकाम्या धावणाऱ्या पुणे ते लोणावळा आणि तळेगाव ते पुणे या लोकल गाड्या रद्द करत, त्याला पर्याय म्हणून पॅसेंजर गाड्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पुणे - प्रवाशांअभावी रिकाम्या धावणाऱ्या पुणे ते लोणावळा आणि तळेगाव ते पुणे या लोकल गाड्या रद्द करत, त्याला पर्याय म्हणून पॅसेंजर गाड्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

लोकल रद्दच्या निर्णयाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करत या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी सामूहिक मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी प्रवासी अभावी रिकाम्या धावणाऱ्या लोकलमुळे मध्य रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्रशासनाने लोकल रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. परंतु, या गाड्यांना पर्यायी पॅसेंजर गाड्यांची व्यवस्था केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मध्य रेल्वेच्या पुणे मंडलचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून धुक्‍याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे ‘सिग्नल दृश्‍यता’ कमी असल्यामुळे लोकल आणि अन्य एक्‍स्प्रेस गाड्या उशिराने धावत होत्या. सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी गाड्या उशिरा सोडण्यात येत होत्या. या सर्व घडामोडींवर मध्य रेल्वे पुणे विभागाचे प्रबंधक मिलिंद देऊस्कर हे व्यक्तिशः लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांनी संयम बाळगून सहकार्य करावे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे.’’

सुमारे १९ डब्ब्यांची शिर्डी-मुंबई पॅसेंजर गाडी कासारवाडी, बेगडेवाडी, घोरावाडी आणि कान्हे वगळता अन्य सर्व स्थानकांवर थांबेल.
वगळलेल्या स्थानकांवरील प्रवाशांसाठी रात्री बाराची लोकल सुरू आहेच.

रात्री पुण्याहून लोणावळ्याकडे आणि तळेगावहून पुण्याकडे धावणाऱ्या लोकलमध्ये अत्यल्प प्रवासी असतात. त्यामुळे या लोकल रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रात्री रद्द केलेल्या तळेगाव-पुणे लोकलऐवजी अतिरिक्‍त पुणे-लोणावळा लोकल आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी शिर्डी-पंढरपूर-मुंबई पॅसेंजर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लांब पल्ल्यांच्या सुपरफास्ट एक्‍स्प्रेस गाड्यांना मार्ग मोकळा मिळू शकणार आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे (पुणे मंडल)

Web Title: pune news local train passenger