पुण्यात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

विदर्भात थंडीची लाट; गोंदियातील पारा 7.4 अंश सेल्सिअस

विदर्भात थंडीची लाट; गोंदियातील पारा 7.4 अंश सेल्सिअस
पुणे - वर्षाच्या अखेरीस नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना थंडीने चांगलीच हुडहुडी भरविली असून, विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक गारठले आहेत. विदर्भासह, मराठवाड्यातही थंडीची लाट निर्माण झाली असून, किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भातील गोंदियामध्ये गुरुवारी 7.6 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली, तर पुण्यात 9.4 अंश सेल्सिअस असे या हंगामातील सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले.

मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. 29) थंडीची लाट येण्याची शक्‍यता आहे, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत (ता. 1) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव आणि निरभ्र आकाश यामुळे थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. दिल्ली, हरियाना, चंडीगड, उत्तर पंजाब, उत्तर राजस्थान, कच्छ, तसेच मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागात थंडीची लाट निर्माण झाली आहे. उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा काहीसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाल्याने विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले, तर मध्य महाराष्ट्र, कोकणातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, जळगाव, नाशिक येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली उतरला आहे. पुण्यात या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी अशा 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गुरुवारी झाली आहे. वर्षाच्या पुण्यात अखेरीस तापमानाचा पारा 10 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

पुण्यातील गेल्या दहा वर्षांत डिसेंबरमध्ये नोंदविलेले नीचांकी तापमान
वर्ष : किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

2016 : 8.3
2015 : 6.6
2014 : 7.8
2013 : 6.8
2012 : 7.4
2011 : 7.6
2010 : 6.5
2009 : 8.5
2008 : 8.6
2007 : 10.9

Web Title: pune news low temperature in pune