'मशिन इंटरफेसिंग'ने क्षणार्धात रोग निदान

सलील उरुणकर
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पुणे - 'रक्त, लघवी तपासणीच्या अचूक अहवालाच्या आधारे रोगाचे तत्काळ निदान आणि त्यावर तातडीने उपचाराची दिशा निश्‍चित करण्यासाठी "पॅथॉलॉजी लॅब'चे "डिजिटायझेशन' करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. "मशिन इंटरफेसिंग'च्या तंत्रज्ञानाचा वापर लॅबमधील तंत्रज्ञ, पॅथॅलॉजिस्टकडून होत असल्यामुळे आता "लॅब टू डॉक्‍टर' या प्रवासातील वेळेची बचत होत आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्या कार्यक्षमतेत आणि तत्परतेतही वाढ होत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले.

पॅथॉलॉजी लॅबमधील अहवाल सामान्यतः कागदी स्वरूपात उपलब्ध होतात. काही लॅबकडून ते "पीडीएफ' फाइलच्या स्वरूपात ई-मेलवर पाठविण्याची सोय असते. तरीही या अहवालांची छापील प्रत घेऊन डॉक्‍टरांकडे जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. अहवाल तयार होणे, तो रुग्णाला मिळणे, त्यानंतर तो डॉक्‍टरांना दाखविणे या संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ वाया जातो. प्रसंगी दुसरा दिवसही उजाडतो. "डिजिटल पॅथॉलॉजी लॅब'मध्ये मात्र हा वेळ खूपच वाचतो. लॅबचे डिजिटायझेशन करणे म्हणजे फक्त संगणकावर "डेटा एन्ट्री' करणे एवढ्यापुरतेच काम आता मर्यादित राहिलेले नाही.

संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अहवालांमध्येही खूप फरक असतो. त्यामुळे हे अहवाल समजून घेण्यातदेखील वेळ लागू शकतो. नवीन यंत्र आणि प्रणाली बसविणे खर्चिक असल्यामुळे अनेक पॅथॉलॉजी लॅबच्या मालक, चालकांकडून त्याबाबत टाळाटाळ केली जाते. मात्र आता "इंटरफेसिंग सॉफ्टवेअर'ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हा खर्चसुद्धा वाचू शकतो. स्पर्धेमध्ये तत्पर आणि बिनचूक सेवा महत्त्वाची असते, त्याकरिता हे तंत्रज्ञान वरदायी ठरू शकते.

काय आहे "मशिन इंटरफेसिंग'?
"पॅथॉलॉजिकल मशिन' हे त्याला असलेल्या कॉम, सीरियल किंवा लॅन "पोर्ट'मार्फत एका संगणकाला जोडलेले असते. मशिनमध्ये तयार झालेली माहिती संगणकापर्यंत पोचविण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. ही माहितीची देवाण-घेवाण एकतर्फी किंवा दुतर्फा असू शकते. मशिनमध्ये टाकलेल्या नमुन्याची ओळख पटविणे आणि त्यासंबंधी माहिती संगणकापर्यंत पोचविण्यासाठी "युनिडिरेक्‍शनल इंटरफेस'चा वापर केला जातो. दुतर्फा (बाय-डिरेक्‍शनल) माहितीची देवाण-घेवाण होत असताना एखाद्या चाचणीसाठी शिल्लक राहिलेल्या नमुन्यांची यादी संगणकाने मशिनकडून मागविणे, तपासणीनंतरचे आकडे मशिनमधून संगणकापर्यंत पोचविण्याची प्रक्रिया होत असते. सॉफ्टवेअरच्या आधारे सुमारे दोनशे मशिन किंवा उपकरणांकडून माहिती संकलित करता येते.

लॅब मशिन इंटरफेसिंगमुळे अहवालातील माहितीची अचूकता वाढते. कर्मचारी, तंत्रज्ञ किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वतः आकडे किंवा अन्य माहिती संगणकामध्ये भरल्यास अनावधनाने चुका होऊ शकतात. असे प्रकार मशिन इंटरफेसिंगमुळे टाळता येतात. चाचणीनंतरचा अहवाल डॉक्‍टरांना तातडीने उपलब्ध होतो. त्यामुळे रुग्णांना वेगाने उपचाराचा फायदा मिळू शकतो. डॉक्‍टरांच्याही वेळेची बचत होते.
- मुकुल मुस्तिकर, लॅब मॅनेजमेंट सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या "जेनेक्‍स ईएचआर'चे अधिकारी

Web Title: pune news machine interfacing sickness