'ॲड. शिंदे यांचे देशासाठी योगदान'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - ‘‘ॲड. रावसाहेब शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशासाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीने साहित्य, कलेसह माणुसकीवर अजोड प्रेम केले. समाजाचे अंतरंग व बाह्यरंग निकोप ठेवणारी पिढी घडविण्याचे काम शिंदे यांनी केले,’’ असे मत साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी गुरुवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेतर्फे ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा एस. एम. जोशी सभागृहामध्ये आयोजित केला होता. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, शिंदे यांच्या पत्नी शशिकला शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन ईटकर आदी उपस्थित होते. पाटील व वैद्य यांच्या हस्ते कर्णिक, शिक्षणतज्ज्ञ कमल किशोर कदम व पत्रकार मधुकर भावे यांना ‘ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  

कर्णिक म्हणाले, ‘‘शिंदे यांच्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार प्रसादाच्या स्वरूपाचा आहे. सध्याचा काळ हा विचित्र आहे. अशा कालखंडात आपण प्रवास करत असून आता सामाजिक मूल्यांची प्रचंड घसरण होत आहे.’’ 

पाटील म्हणाल्या, ‘‘शिंदे हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. शिंदे यांची भेट घेताना माझ्या माहेरचा आणि मायेचा माणूस भेटल्याचा आनंद होत असे. अतिशय साधेपणाने राहणाऱ्या शिंदे यांचा सहवास आम्हाला मिळाला, हे आमचे भाग्य आहे.’’ 

वैद्य म्हणाले, ‘‘शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना संगणकभिमुख बनविण्याचे काम केले.’’

कदम म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी मला राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्यास प्रोत्साहन दिले. ही माणसे मोठी होती, तशीच त्यांच्यातील माणुसकीही मोठी होती.’’ सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

Web Title: pune news madhu karnik Raosaheb Shinde