सहा महिन्यांनंतरही महामेट्रो जागांच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतरही गेल्या सहा महिन्यांत मेट्रोच्या स्थानकांसाठी एकही जागा महामेट्रोच्या ताब्यात आली नाही. त्याची कबुली महामेट्रो कंपनीचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. रेंजहिल्स, कोथरूडमधील कचरा डेपोची आणि शिवाजीनगरमध्ये कृषी महाविद्यालयाची जागा दोन महिन्यांत ताब्यात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांनी 24 डिसेंबर रोजी केले होते. त्यानंतर शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होईल, अशी अपेक्षा होती; परंतु काम अद्याप रखडले आहे. तसेच महामेट्रोच्या कामाबाबत नागरिकांनी अनेक शंका उपस्थित केल्या असून, त्या बाबत काही अफवाही पसरल्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दीक्षित म्हणाले, ""रेंजहिल्स, कोथरूड आणि कृषी महाविद्यालयाची जागा महामेट्रोला देण्यास संबंधित यंत्रणांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होऊन त्या जागा ताब्यात येतील.''

वनाज- रामवाडी मार्गासाठी फेरनिविदा का मागविल्या, यावर दीक्षित यांनी गृहित रकमेपेक्षा जादा दराने निविदा आल्यामुळे त्या पुन्हा मागविल्याचे सांगितले; परंतु किती टक्के जादा रकमेच्या निविदा आल्या, याचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. मेट्रो प्रकल्पाची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी संभाजी उद्यानात मेट्रो माहिती केंद्र उभारण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नकार दिला आहे. या बाबत विचारले असता, दीक्षित यांनी उद्यान विभागाने नकार दिलेला नाही तर, उद्यानात पक्के बांधकाम करण्यास मनाई असल्याचे सांगितले. त्याबाबत चर्चा सुरू असून, अन्य पर्याय वापरून माहिती केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्पात सुमारे 680 झाडांचा अडथळा आहे. त्यासाठी पर्वती टेकडी आणि आकुर्डीमध्ये सुमारे चार हजारांहून अधिक झाडे लावण्यात येतील. तसेच काही झाडांचे पुनर्रोपणही करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मेहामेट्रोचे तांत्रिक संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, विशेष अधिकारी शशिकांत लिमये या प्रसंगी उपस्थित होते.

तीन स्थानके एकात्मिक
स्वारगेट येथील मेट्रो स्थानक जमिनीपासून खाली 20 मीटरवर उभारण्यात येणार आहे. पीएमपीच्या बस, रिक्षा, एसटी यांच्याशी मेट्रो जोडली जाईल, अशा पद्धतीने त्याची एकात्मिक रचना करण्यात येणार आहे. याच धर्तीवर पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथेही स्थानके उभारण्यात येणार आहेत. मेट्रो प्रकल्पाचे काम जसे सुरू होईल, त्यानुसार वाहतूक आराखडा तयार करून पोलिसांची मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.

Web Title: pune news mahametro waiting for land