आजच्या काळात तुमची खरी कसोटी : विद्यासागर राव

स्वप्निल जोगी
सोमवार, 29 मे 2017

आज तुमच्या पालकांनाच नव्हे तर, अख्ख्या देशाला तुमचा अभिमान आहे. उद्याचे राष्ट्राचे भविष्य तुमच्याच हातात आहे. पण, तुमचा प्रवास कदाचित सोपा नसेल. तुम्हाला अनेक गोष्टी शिकत पुढे जावे लागेल. प्राप्त ज्ञानाचा उपयोग व्यवहारात कसा करावा, हे तुम्हांला शिकावे लागेल.

पुणे: "करिअरमध्ये यापुढे तुम्ही अनेक नव्या उंची गाठाल. पण आव्हानं सुद्धा मोठी असतील. अशावेळी कष्टाला पर्याय नसेल. आपली कौशल्ये सतत घासून पाहावी लागतील. विशेषतः अख्खे जग जेव्हा दहशतवादाच्या छायेत आहे, अशा आजच्या काळात तुमची खरी कसोटी असणार आहे. भारत नव्या आणि विकासाच्या दिशेने प्रवास करत असताना त्या प्रवासात लष्कराचे योगदान अतीव महत्त्वाचे ठरते," अशा शब्दांत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 132 व्या तुकडीच्या सोमवारी झालेल्या पदवीदान सोहळ्यात राव बोलत होते. या वेळी 308 विद्यार्थ्यांना विज्ञान, संगणक विज्ञान आणि कला शाखेच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. यांतील 6 परदेशी विद्यार्थी आहेत. एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर, रिअर ऍडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, कमांडन्ट ? आदी या वेळी उपस्थित होते.

राव म्हणाले, "एनडीए ही देशाच्या प्रगतीत योगदान देणारी महत्त्वाची संस्था आहे. आजवर अनेक योद्धे याच संस्थेने देशसेवेसाठी दिले आहेत. यात अर्थातच त्यांची अथक मेहनत आणि देशासाठी असणारी वचनबद्धता आहे ! आपल्या देशाच्या 'विविधतेत एकतेची' खरी खूण ही आपल्या लष्करी सेवेतील जवानांकडे पाहिल्यावर पटते."

क्लेर म्हणाले, "प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमात तीन वर्षांत ज्ञानार्जन तर होतेच, पण विद्यार्थ्यांना जी जीवनमूल्ये आत्मसात करता येतात, ती त्यांच्या भवितव्यासाठी अधिक मोलाची ठरतात. गेली अनेक वर्षे ही संस्था देशासाठी जबाबदार आणि प्रगल्भ अशा अधिकाऱ्यांची निर्मिती करत आली आहे."

दरम्यान, प्रबोधिनीच्या खचाखच भरलेल्या हबीबुल्लाह सभागृहात या चित्तवेधक सोहळ्यानिमित्त मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आपले तीन वर्षांचे पदवी शिक्षण यशस्वी पद्धतीने संपवल्याच्या आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. विद्यार्थ्यांचे पालक देखील आपल्या पाल्यांचा हा देखणा कर्तृत्वसोहळा अनुभवायला आवर्जून उपस्थित होते.

ताज्या बातम्या-

Web Title: pune news maharashtra governor c vidyasagar rao in nda