मांजाच्या खुलेआम विक्रीचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे - चिनी मांजावर बंदी असतानाही, प्रत्यक्षात मांजाची खुलेआम विक्री होत असल्याचा निषेध पतित पावन संघटनेतर्फे आंदोलनाद्वारे व्यक्त करण्यात आला. मांजाची विक्री करणाऱ्या रविवार पेठेतील दुकानांसमोर संघटनेने सोमवारी आंदोलन केले.

पुणे - चिनी मांजावर बंदी असतानाही, प्रत्यक्षात मांजाची खुलेआम विक्री होत असल्याचा निषेध पतित पावन संघटनेतर्फे आंदोलनाद्वारे व्यक्त करण्यात आला. मांजाची विक्री करणाऱ्या रविवार पेठेतील दुकानांसमोर संघटनेने सोमवारी आंदोलन केले.

चिनी मांजावरील बंदी प्रत्यक्षात यावी, मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ‘‘बंदी असलेला चिनी मांजा विकणारे आणि त्याला छुपी मदत करणाऱ्या पोलिस प्रशासनाचा जाहीर धिक्कार, अजून किती लोकांचा आणि पशू-पक्ष्यांचा बळी गेल्यावर महाराष्ट्र शासनाला जाग येणार आहे?’’ अशा घोषणा या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. संघटनेतर्फे परिसरातील मांजा विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांना चिनी मांजाची विक्री करण्यात येऊ नये, असे समजावून सांगण्यात आल्याचे संघटनेचे शहर पालक मनोज नायर यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे शहर प्रमुख सीताराम खाडे, कार्याध्यक्ष दिनेश भिलारे, गोकूळ शेलार उपाध्यक्ष, कसबा विभाग प्रमुख योगेश वाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पतंग उडविताना सावधगिरी बाळगा - महावितरण 
शहरी व ग्रामीण भागात उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीज यंत्रणांचे जाळे पसरलेले आहे; परंतु वीजवाहिन्यांच्या परिसरात नागरिक, लहान मुले पतंग उडवितात. बहुतांश वेळेला विजेच्या तारांमध्ये पतंगाचा मांजा अडकल्याने विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो.

वीजप्रवाह सुरू असताना वाहिन्या, रोहित्रांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी जाणे म्हणजे धोका पत्करण्यासारखे आहे. परिणामी, विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्‍यता असल्याने पतंग उडविताना वीज यंत्रणांपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

वीजवाहिनीपासून दूर उडवा पतंग 
मकरसंक्रांतीच्या सणाच्या प्रसंगी अथवा उन्हाळ्याची सुटीत शहर व ग्रामीण भागात नागरिक उत्साहाने पतंग उडवितात. पतंगांच्या मांजामुळे वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होते. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांनी तसेच लहान मुलांनी वीजवाहिन्या व वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंग उडवावा.

पालकांनी दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. पतंग उडविताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. वीज यंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीजप्रवाह सुरू असलेल्या वीज यंत्रणेपासून दूर अंतरावर पतंग उडवावेत, असेही महावितरणने कळविले आहे.

Web Title: pune news manja sailing protest