आता तरी सरकारला शहाणपण येईल का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामापेक्षा तसूभरही कमी नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात फुले, शाहू, आंबेडकरांनी नेतृत्वाची गरज पूर्ण केली. त्यांनीच आम्हाला शिक्षणाची प्रेरणा दिली. गरिबी, शिक्षक आणि समतेच्या विचारांनी मला घडविले. या देशाला मराठवाड्याने सगळ्याच क्षेत्रांसाठी मोठे योगदान दिले आहे. 
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 

पुणे  - ""मराठवाड्यात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी चित्रपटसृष्टीतील कलावंत काम करत आहेत. आता तरी सरकारला शहाणपण येईल का? मराठवाड्यातला शेतकरी रोज मरत असून, त्या मरणावरच सरकार सिंहासन भोगत आहे,'' अशी टीका माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. 

मराठवाडा समन्वय समितीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवात ते बोलत होते. या प्रसंगी भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड, समितीचे अध्यक्ष राजकुमार धरगुडे पाटील उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, "पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, उद्योजक ओमप्रकाश पेठे, प्रगतिशील शेतकरी ईश्‍वरदास घनघाव यांना "मराठवाडा भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. डॉ. वसंत थोरवे, विश्वांजली गायकवाड, शीतल ढेकळे, युवा भारुडकार कृष्णाई उळेकर यांचाही या वेळी सत्कार झाला. 

गायकवाड म्हणाले, ""वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात वेगळे काम करण्यासाठी प्रयत्न केला. सरकारवर टीका करून उपयोग नाही, तर स्वतः क्रियाशील झाले पाहिजे. स्वतःपासून सुरवात करा, समाज नक्कीच बदलेल. संधी खूप आहेत, त्याचा फायदा घेतला पाहिजे.'' 

गित्ते म्हणाले, ""शेतकरी व शिक्षण हेच मराठवाड्याचे भांडवल आहे. मराठवाड्यातील "लातूर पॅटर्न' सगळ्याच क्षेत्रात आणला पाहिजे.'' 

वारे म्हणाले, ""मराठवाडा मुक्ती दिन हा आता "मराठवाडा विकास दिन' म्हणून साजरा झाला पाहिजे. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न संपविण्यासाठी संवाद झाला पाहिजे. जातीय मोर्चांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत.'' 

प्रा. तांबोळी म्हणाले, ""मुस्लिम महिलांचे या देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान असूनही त्यांचे कार्य दुर्लक्षित आहे. माझ्या दृष्टीने भारतीय संविधान हेच "बडी किताब' आहे.'' 

Web Title: pune news marathwada shripal sabnis