बाजार समितीचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील धान्यांसह अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे हे सर्व दुकानदार अडचणीत आले आहेत. 

पुणे - गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील धान्यांसह अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे हे सर्व दुकानदार अडचणीत आले आहेत. 

घाऊक विक्रेत्यांकडून गहू, तांदूळ, खाद्यतेलासह अन्य वस्तू खरेदी करून भुसार विभागात किरकोळ विक्री करण्याचा प्रकार नवीन नाही. हा प्रकार वाढल्याने घाऊकऐवजी किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय जोमाने सुरू झाला होता. बाजार समिती अधिनियम कायद्यान्वये बाजाराच्या आवारात शेतीमालव्यतिरिक्त अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करता येत नसल्याचे स्पष्ट आहे. याच मुद्दाला धरून घाऊक व्यापाऱ्यांपैकी काही व्यापाऱ्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर घाऊक विक्री सुरू असताना किरकोळ विक्री करता येणार नसल्याचा निर्णय दिला. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करणे आवश्‍यक होते; परंतु बाजार समिती प्रशासनाच्या आशीर्वादामुळे भुसार विभागात किरकोळ विक्रीची दुकाने सुरू राहिली.

दुकाने इतकी वर्षे सुरू कशी?
ही दुकाने इतकी वर्ष कशी सुरू राहिली, याला जबाबदार कोण आहे, त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. संबंधितांवर कारवाईचे धाडस पणन मंडळ दाखविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नूतनीकरण प्रक्रिया सुरू
आजमितीला भुसार विभागात पन्नासपेक्षा अधिक किरकोळ विक्रेते अधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत; तसेच शेतीमाल सोडून प्लॅस्टिक, रद्दी, सॉस, साबण, कॉस्मेटिकची विक्री करणारी २५ दुकाने आहेत. दरवर्षी किरकोळ विक्रेत्यांना परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. भुसारासह फळभाज्या आणि फळांमधील किरकोळ विक्री करणाऱ्या सुमारे १५० विक्रेत्यांचे परवाने बाजार समितीकडे नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

दाखल झालेल्या परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया बाजार समितीकडून सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात समितीचे सचिव बी. जे. देशमुख म्हणाले, ‘‘जे परवाने नियमांत बसत नाहीत, अशा परवान्यांचे नूतनीकरण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’ मार्च अखेरपर्यंत परवान्याचे नूतनीकरण झाले नाही, तर हे दुकानदार अडचणीत येणार आहेत.

Web Title: pune news market committee shop pemission