बाजारातील उलाढाल थंडच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जीएसटीतील काही गोष्टींबाबत साशंकता
पुणे - जीएसटीतील काही गोष्टींविषयी अद्याप साशंकता असल्याने बाजारातील उलाढाल थंडच राहिली आहे. नवीन पद्धतीनुसार बिले छापून आली नसल्याने काही व्यापाऱ्यांकडून कच्ची पावती दिली जात आहे. मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात हा अनुभव येत आहे.

जीएसटीतील काही गोष्टींबाबत साशंकता
पुणे - जीएसटीतील काही गोष्टींविषयी अद्याप साशंकता असल्याने बाजारातील उलाढाल थंडच राहिली आहे. नवीन पद्धतीनुसार बिले छापून आली नसल्याने काही व्यापाऱ्यांकडून कच्ची पावती दिली जात आहे. मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात हा अनुभव येत आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी बाजारातील उलाढाल थोड्याफार प्रमाणात सुधारली असली, तरी काही गोष्टींबाबत व्यापारी आणि ग्राहक यांच्यात संभ्रम आहे. महिनाअखेर झाली आहे, अद्याप नोकरदारांचे वेतन झालेले नाही, यामुळे बाजारातील उलाढाल मंदावलेली आहे.

ग्राहक सावधगिरी बाळगून असून, मालाच्या किमतीविषयी स्पष्टता आल्यानंतरच तो खरेदी करू लागेल, असा विश्‍वास व्यापाऱ्यांना आहे. या आठवड्यात किमतीचे चित्र स्पष्ट होईल, काही शंकांचे निरसन होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. सोनेखरेदीला तुलनेत कमी प्रतिसाद असला, तरी पुढील काळात पुन्हा खरेदी वाढेल, असे सराफ सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. ""जीएसटीमधील तरतुदींविषयी सराफ आणि ग्राहकांपर्यंत काही तपशील पोचू शकला नाही.

जुने सोने देऊन नवीन सोने खरेदी केल्यावर जीएसटी द्यावा लागेल का? जादा सोन्याच्या खरेदीवर तो द्यावा लागेल का? याबाबत शंका आहे. जुने सोने देऊन नवे सोने खरेदी करणारा ग्राहकही चांगल्या प्रमाणात असतो. अशा काही किरकोळ गोष्टींविषयी लवकर स्पष्टता येणे आवश्‍यक आहे,'' असेही त्यांनी नमूद केले.

वाहनविक्रेते विक्रांत जगताप म्हणाले, ""महिन्याचा पहिला आठवडा आहे. जीएसटी नुकताच लागू झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती कमी होतील; परंतु त्यामध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत वाहनांच्या किमती स्पष्ट होतील. त्यानंतरच वाहनखरेदी आणि त्याविषयी चौकशी वाढू लागेल.'' बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट आणि लोखंड उत्पादक कंपन्यांकडून अद्याप भाव निश्‍चित झाला नसला, तरी तेही दोन दिवसांत निश्‍चित होतील अशी स्थिती आहे.

मार्केट यार्ड येथील घाऊक किराणा भुसार मालाच्या बाजाराची परिस्थिती सुधारलेली नाही. महिन्याचा पहिला आठवडा असूनही मागणीत वाढ झालेली नाही. जीएसटीसाठी ब्रॅंडेड आणि नॉन ब्रॅंडेड धान्याची वेगवेगळी वर्गवारी करावी लागेल. बिलावर जीएसटीचा दर, बाजार शुल्क, देखरेख शुल्क, हमाली आदीचाही उल्लेख करावा लागत असल्याने त्यादृष्टीने त्यात बदल करावे लागणार आहेत. दुकानातील सॉफ्टवेअरही बदलावे लागणार आहे. ते बदलणाऱ्यांचे कामही सध्या वाढले आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींविषयी व्यापाऱ्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र दिले आहे. जीएसटीबाबत अधिक स्पष्टता येईपर्यंत व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात, असे या पत्रात नमूद केल्याचे समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी सांगितले.

Web Title: pune news market transaction slow