साहित्य संमेलनात पर्यावरणाचा जागर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - बाराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणाऱ्या "पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदी साहित्यिक मारुती चितमपल्ली यांची निवड झाली आहे. शनिवारी (ता. 6) रंगणाऱ्या या संमेलनात पर्यावरण संवर्धनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजिले आहेत. व्याख्याने, चर्चासत्र, विद्यार्थ्यांच्या पर्यावरण प्रकल्प सादरीकरणासह "प्रदूषण टाळा, नदी वाचवा' या विषयावर युवक-युवती ठराव मांडणार आहेत. 

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने आयोजिलेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात हे संमेलन होईल. या वेळी चितमपल्ली यांची मुलाखत ऐकण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळणार आहे. 

या संमेलनाची माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या प्रसंगी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, वीरेंद्र चित्राव, सुनीताराजे पवार आणि प्रकाश पायगुडे उपस्थित होते. या संमेलनात "चंगळवादी वृत्ती आणि पर्यावरण' या विषयावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होणार आहे, तर "प्रदूषित नद्या आणि आपण' यावर परिणिता दांडेकर या विचार मांडणार आहेत. तसेच पर्यावरण विषयावर आधारित पारितोषिक विजेत्या प्रकल्पांचे सादरीकरण महाविद्यालयीन विद्यार्थी करणार आहेत. याशिवाय अंकुश आरेकर आणि लता ऐवळे यांचा "रानातल्या कविता', तर डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रिया चित्राव यांचा "हिरवाई' हा कार्यक्रमही होईल. त्याचबरोबर पारितोषिक वितरणासह चितमपल्ली यांची मुलाखत जयंत कर्णिक घेणार आहेत. 

चित्राव म्हणाले, ""पर्यावरण संवर्धनावर आधारित हे संमेलन असून, त्यात अधिकाधिक प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. याद्वारे पर्यावरणावर जनजागृती करण्यात येणार आहे. संमेलनात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या ठरावाचा अहवाल तयार केला जाणार आहे. तो महापालिकेला सादर केला जाईल.'' हे संमेलन सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे.

Web Title: pune news Maruti Chitampalli sahitya sammelan environment