मेहरुन्निसा दलवाई यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पुणे - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच धर्मनिरपेक्ष भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले.

पुणे - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच धर्मनिरपेक्ष भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले.

शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी रात्रीपर्यंत त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. मात्र, त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले; पण रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या मागे रुबिना व इला या दोन मुली व नातवंडे आहेत.
दलवाई यांच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरुन्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. "हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या त्या अध्यक्ष होत्या. तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यातही त्या अनेक वर्षे सक्रिय होत्या. "मी भरून पावले आहे' हे 1995 मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

मुस्लिम समाजातील समाजसुधारक चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्‍नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरुन्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. या कार्यात त्या अखेरपर्यंत सहभागी होत्या.

हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी अंतिम इच्छेनुसार मुस्लिम असूनही मरणोत्तर देहाचे दहन करावे, असे त्या काळी सांगितले होते. मेहरुन्निसा दलवाई यांनी त्याच्याही पुढे एक पाऊल जात देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी सात वाजता त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

Web Title: pune news mehrunissa dalwai death