मेट्रोसाठी जागेला ‘ग्रहण’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा मिळण्याचे ग्रहण अद्याप सुटण्याची शक्‍यता नाही. धान्य गोदामातील सध्याच्या शासकीय कार्यालयांसाठी पर्यायी जागांची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत जागा देता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा मिळण्याचे ग्रहण अद्याप सुटण्याची शक्‍यता नाही. धान्य गोदामातील सध्याच्या शासकीय कार्यालयांसाठी पर्यायी जागांची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत जागा देता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेत महामेट्रोच्या वनाज- रामवाडी, पिंपरी स्वारगेट मार्गांचे आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी- शिवाजीनगर मार्गासाठी बहुमजली स्थानक होणार आहे. या जागेत सध्या धान्य गोदाम, सेतू सेवा केंद्र, निवडणूक आणि पुरवठा विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये पर्यायी जागेत हलवून, त्या जागा महामेट्रोला देण्याचा धोरणात्मक निर्णय या पूर्वी झाला आहे. परंतु पर्यायी जागा महामेट्रो उपलब्ध करून देणार आहे. काही ठिकाणी भाडे देण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. परंतु ते वाजवी असावे, असे महामेट्रोचे म्हणणे असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. महामेट्रो सकारात्मक नसल्यामुळे जागा कार्यालये स्थलांतरचा प्रश्‍न कायम आहे. तसेच सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत जागा सोडणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

शिवाजीनगरमधील धान्य गोदामे ही कोरेगाव पार्कमध्ये, तर पुरवठा विभागाची कार्यालये ही जिल्हा परिषदेची जुनी इमारत, एसटी स्थानकाजवळ आणि भोसरीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. सेतूसाठी शिवाजीनगरमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रजवळ जागा मिळाली आहे. परंतु तेथे फर्निचर नाही. तसेच पुणे रेल्वे स्थानकाजवळ दोन मजल्यांची जागा मिळेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात एकच मजला उपलब्ध झाला आहे. निवडणूक कार्यालयालाही अद्याप जागा मिळालेली नाही. धान्य गोदामे कोरेगाव पार्कमध्ये स्थलांतरित करण्यास फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एफसीआय) नकार दिला आहे.

शिवाजीनगरमधील कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे या पूर्वी पाच वेळा बैठका झाल्या आहेत. परंतु या बाबतचा पेच सुटलेला नाही. या बाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा महामेट्रोला देण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. परंतु गोदामाच्या आवारातील प्रशासनाची कार्यालये अन्यत्र हलविण्यासाठी महामेट्रोने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. त्याशिवाय स्थलांतर शक्‍य नाही,’’

पर्यायी जागा तातडीने देणार 
या बाबत महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मणम म्हणाले, ‘‘पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी या बाबत चर्चा झाली आहे. त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार शिवाजीनगर धान्य गोदामातील जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी महामेट्रोचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याचा वेग आणखी वाढविण्यात येईल.’

Web Title: pune news metro