मेट्रो होणार वर्तुळाकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पुणे - महामेट्रोच्या दोन मार्गांची अंमलबजावणी सुरू असतानाच एसएनडीटीपासून कर्वेनगर-सिंहगड-कात्रज मार्गे थेट खराडी गाठणाऱ्या तिसऱ्या मार्गाचेही नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ वनाज-रामवाडी मार्ग पूर्ण झाल्यावर अनेक गावांना सामावून घेणारा अर्धवर्तुळाकार मेट्रो मार्ग प्रत्यक्षात येईल. परिणामी महापालिकेच्या हद्दीबाहेरीलही लाखो प्रवाशांची सोय होऊ शकणार आहे.

पुणे - महामेट्रोच्या दोन मार्गांची अंमलबजावणी सुरू असतानाच एसएनडीटीपासून कर्वेनगर-सिंहगड-कात्रज मार्गे थेट खराडी गाठणाऱ्या तिसऱ्या मार्गाचेही नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ वनाज-रामवाडी मार्ग पूर्ण झाल्यावर अनेक गावांना सामावून घेणारा अर्धवर्तुळाकार मेट्रो मार्ग प्रत्यक्षात येईल. परिणामी महापालिकेच्या हद्दीबाहेरीलही लाखो प्रवाशांची सोय होऊ शकणार आहे.

नियोजित मेट्रो प्रकल्पातील पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मार्ग वाढविण्याचे नियोजन असून, त्यात स्वारगेट ते कात्रज आणि रामवाडी ते खराडीपर्यंतच्या मार्गांचा समावेश करण्यात येईल. त्यासाठी निधी उभारण्याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी शनिवारी ‘सकाळ’ला खास मुलाखतीत दिली. रेल्वे, राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रवाशांना मेट्रो सेवेशी जोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वनाजपासून नगर रस्त्यावरील रामवाडीपर्यंतच्या १४.६६ किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग कर्वे रस्त्यावरून जाणार आहे. त्याचबरोबर कर्वे रस्त्यावरील एसएनडीटीपासून मेट्रोचा दुसरा फाटा काढण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. तो फाटा एसएनडीटीपासून निघेल आणि कर्वेनगर, शिवणे, सिंहगड रस्ता, नांदेड सिटी, कात्रज, उंड्री, महंमदवाडी, हडपसरमार्गे खराडी गाठेल. मूळ वनाजपासूनचा मार्ग रामवाडीपर्यंत नेण्याचे सध्याचे नियोजन असले तरी तो खराडीपर्यंत वाढविण्याचाही विचार सुरू आहे. त्यामुळे खराडीपासूनचा वर्तुळाकार मेट्रो मार्ग एसएनडीटीपर्यंत जाणार आहे.

पुण्यात मेट्रोची गरज, प्रत्यक्ष काम, त्याचे टप्पे, मार्गाचे जाळे, त्यातील सेवा-सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. 
लिमये म्हणाले, ‘‘मेट्रोच्या दोन्ही मार्गांचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते न्यायालय आणि वनाज ते न्यायालयापर्यंतचा टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सध्या खांब (पिलर) उभारणीचे काम सुरू आहे. तसेच स्थानकांचेही काम हाती घेतले जाणार आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या (इलिव्हेटेड) मार्गाचे काम लवकर होईल, पुढील अडीच ते तीन वर्षांत तो पूर्ण होऊ शकेल. भूमिगत मार्गाच्या कामासाठी येत्या एक-दीड महिन्यात निविदा काढण्यात येतील. या दोन्ही मार्गांचे काम २०२१-२२ पर्यंत पूर्ण होईल.’’ नदीपात्रालगतच्या मार्गामुळे पर्यावरणाला हानी पोचणार नाही तसेच मेट्रोच्या स्टेशनसाठी पुरेशी जागा हवी, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रोसेवेला अधिकाधिक प्रवाशांशी जोडले जाणार असून, त्याकरिता थांब्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी थांब्यांवर पुरेशी पार्किंग व्यवस्था असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या घटकांमधील प्रवाशांना जोडताना, लोकवस्ती आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांना मार्ग जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला अगदी सहजपणे मेट्रो उपलब्ध होईल आणि त्यासाठी १० ते ५० रुपयांपर्यंत तिकीट दर असेल. 
-  शशिकांत लिमये, तांत्रिक सल्लागार, महामेट्रो

Web Title: pune news Metro will be circular