मेट्रोच्या गतीसाठी ठेकेदारांना ‘बोनस’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये महामेट्रोची तब्बल १८०० कोटी रुपयांची कामे सुरू असून, त्यासाठी १० ठेकेदार काम करीत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण केल्यास संबंधित ठेकेदारांना बोनस आणि इन्सेंटिव्ह देण्याचा धोरणात्मक निर्णय महामेट्रोने घेतला आहे, तर विलंब झाल्यास संबंधित ठेकेदारांना आर्थिक दंडही करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस आणि इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी नमूद केले. 

पिंपरी- शिवाजीनगरदरम्यान एलिव्हेटेड (रस्त्यावर खांब उभारून मार्ग तयार करणे) तर वनाज- डेक्कनदरम्यान मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. त्या दोन्ही कामांसाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या दोन्ही मार्गांवरील स्थानकांसाठी सुमारे ९०० कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या शिवाय सांडपाण्याच्या वाहिन्या, जलवाहिनी, महावितरणच्या केबल, दूरसंचार कंपन्यांच्या, गॅसलाइन आदींचे स्थलांतर करण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी महामेट्रोचे सध्या दहा ठेकेदार काम करीत आहेत. त्यांना या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यात कामे सुरू राहणार
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्रो मार्गांचे आणि स्थानकांचे काम सुरू आहे. पावसाळ्यातही ही कामे रोज सुरू राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसातही कामे कशी सुरू राहतील, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कामे होणार आहेत, असेही ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले. सुरू असलेल्या कामांवर त्या काळात मनुष्यबळ कमी पडणार नाही, याचीही दक्षता घेण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news metro work contractor bonus