पोलिस बंदोबस्तात दुधाचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने रविवारी दूध संस्थांच्या वाहनांना पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना दूध वेळेवर उपलब्ध झाले. मात्र, शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 5) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर दूध संस्थांनी सोमवारी पुरेल एवढा दुधाचा साठा करून ठेवला आहे. मात्र, बंदमुळे दुधाच्या गाड्या अडविल्यास, परवाच्या दिवशी मंगळवारी (ता.6) दुधाचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. 

प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. पुणे जिल्ह्यात रविवारी केवळ 25 ते 30 टक्के दूध संकलन झाले. महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर तुटवडा भासू नये, यासाठी चितळे दूध डेअरीतर्फे आदल्या दिवशीच दूध पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे ग्राहकांना दूध मिळेल. संपामुळे एक दिवस संकलन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मागील चार दिवसांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये पंधरा टक्के घट झाली आहे; परंतु आता पोलिस बंदोबस्तात दूध गाड्या सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर दुधाचे संकलन झाल्यास वितरणाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे "चितळे दूध'चे प्रवक्ते गिरीश चितळे यांनी सांगितले. 

मावळ, मुळशी, वेल्हा व भोर भागातून रविवारी सुटे दूध कमी प्रमाणात आले. त्यामुळे गणेश पेठेतील दूध बाजारात आवक घटली. अठरा लिटर दुधाच्या घागरीला 1320 रुपये भाव मिळाला. बाजारात नेहमी पन्नास ते पंचावन्न दराने दुधाची विक्री होते; पण संपामुळे पंचाहत्तर ते ऐंशी रुपये भाव देऊनही फारशी खरेदी झाली नाही. रमजानचा महिना सध्या सुरू असल्याने दुधाची निकड जाणवत आहे. शनिवारी साडेतीन हजार लिटर, तर रविवारी दोनच हजार लिटर दूध आले. मागणी असूनही पुरवठा करता येत नसल्याचे दूध बाजार खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय हिंगमिरे यांनी सांगितले. 

संप काळात जादा दराने दूध विक्री करणे हे संधिसाधूपणाचे लक्षण आहे. ही ग्राहकांची आर्थिक पिळवणूक आहे. संपामुळे संघाच्या दीड कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. सोमवारसाठी एक लाख 27 हजार लिटर दुधाचे संकलन झाले आहे. 
-डॉ. विवेक क्षीरसागर, कार्यकारी संचालक, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ

Web Title: pune news milk police security