दुधाचा तुटवडा आज भासणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

संपामुळे संकलन मुबलक न झाल्याचा परिणाम

पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी दुधाचे संकलन मुबलक प्रमाणात होऊ शकले नाही. त्यामुळे उद्या (ता. ३) पुणे शहरात दुधाचा पुरवठा करू शकणार नसल्याचे चितळे दूध डेअरीतर्फे सांगण्यात आले आहे, तर दुधाच्या गाड्या अडविण्यात येत असल्याने अन्य डेअरी व्यावसायिकांनीदेखील दुधाचा पुरवठा करण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. मात्र, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानेदेखील संकलन झाले नाहीतर परवापासून दूध वितरण होऊ शकणार नसल्याचे म्हटले आहे. 

पुणे शहरात दिवसाला पंधरा लाख लिटरहून अधिक दुधाची मागणी असते; परंतु शेतकऱ्यांनी गुरुवार (ता. १) पासून राज्यभरात बेमुदत संप पुकारल्याने डेअरी व्यावसायिकांना दुधाचा पुरवठा करणे अशक्‍य झाले आहे. चितळे दूध डेअरीचे प्रवक्ते गिरीश चितळे म्हणाले,‘‘उद्या आमची एकही गाडी पुणे शहरात येणार नाही. दररोज पुणे आणि पिंपरी चिंचवड करिता साडेचार लाख लिटर दूध येते; पण शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी आम्ही आज (शुक्रवारी) दुधाचे संकलन बंद ठेवले होते. शेतकऱ्यांकडून उद्या (शनिवारी) दुधाचे संकलन झाले नाहीतर परवाही दुधाच्या गाड्या येऊ शकणार नाहीत.’’ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे म्हणाले, ‘‘पुणे आणि मुंबईसाठी दुधाची गरज सर्वाधिक असते. पुणे शहराकरिता दररोज सव्वा ते दीड लाख लिटर दूध उपलब्ध करून देतो; परंतु रतिबाच्या दुधाचे संकलन होत नाही. त्यामुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक दूध आणण्यास तयार नाहीत. त्यामुळे दूध उपलब्ध करून देऊ शकत नाही. मात्र, उद्यासाठी साधारणतः ऐंशी हजार लिटर दुधाची व्यवस्था केली आहे.’’ महाराष्ट्र दूध व्यावसायिक संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले,‘‘संपामुळे दुधाचे संकलन झाले नाही. त्यामुळे शहरात सत्तर ते पंचाहत्तर टक्के दुधाचा तुटवडा उद्यापासून भासणार आहे. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही; पण दुधाच्या उत्पादनातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न नेहमीच करण्यात येतो. मात्र, शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून देऊ नये.’’

Web Title: pune news milk shortage today