पुणे: मावळ तालुक्यात दूध संकलनासाठी नामवंत कंपन्यांचा शिरकाव

रामदास वाडेकर
रविवार, 16 जुलै 2017

जिल्हा संघ, अमूल, खाजगी खरीदीदार किंवा मावळ दूध कंपनी कोणीही स्वतःच्या नफ्यातील अधिकचा वाटा दूध उत्पादक शेतक-याच्या पदरात टाकणार नाही. प्रत्येक जण दूध खरेदीत दूधाची प्रत गुणवत्ता याची कारणे पुढे करीत कमी अधिक फरकाने दूधाची खरेदी करतोय. उत्पादकही प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे याची दखल घेत दूध विक्री करताना दिसतोय.

टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यात दूध संकलनासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला कार्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. ग्रामीण भागात दूधाचे वाढत उत्पन्न पाहून नामवंत कंपन्यांची दूध संकलनासाठी स्पर्धा होऊ लागली आहे. यात अमूलने सध्या आघाडी घेतली आहे. तर टाटा पाॅवर कंपनी व ए.एल.सी. ने आंदर मावळातील १००० महिलांच्या मालकीची दूध कंपनी स्थापन केली आहे.

कै.वामनराव घारेंनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या स्थापनेत पुढाकार घेतला, पवन मावळ आणि आंदर मावळातून लाॅरीतून दूध संकलन केले. त्यानंतर कै. राणबा भोईरकर, कै. अण्णासाहेब ढमाले यांनी दूध संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनाही भोयरे, वाहनगाव, वडेश्वर, बेबडओहळ आदि गावात सहकारी संस्थांना बळकटी देऊन दूध संकलनावर भर दिला. वडेश्वरचे नथुराम लष्करी यांनी वाहनगावच्या आंदर मावळ सहकारी दूध उत्पादक संस्थेची विभागणी करून ठोकळवाडी धरणाच्या वेढयावर १९८५ ते १९९० च्या दरम्यान नव्याने २२ सहकारी दूध संस्था उभ्या केल्या. ग्रामीण भागातून दूध संघाला त्या परिस्थितीत स्पर्धक दूध उत्पादक कंपन्या त्या मानाने नव्हत्या. पुणे पिंपरी शहरात दूध विक्री करू शकणाऱ्या दूध उत्पादक गवळयांनी शहरात दूध विकले.

परंतू आंदर मावळाच्या पश्चिम भागात एकमेव जिल्हा दूध संघ एकमेव खरेदीदार होता. पुढच्या काळात बाळासाहेब नेवाळेंनी दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधित्व करायला सुरूवात केली. दूध उत्पादनाच्या वाढीसाठी त्यांनी नाबार्डच्या मदतीने कमी व्याजदरात दुभत्या जनावरांना कर्ज पुरवठा करायला मदत केली. जनावरांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर, घरपोच व माफक दरात पशुखाद्य उपलब्ध करून दिले. मावळातील कोणत्याही शेतकऱ्यांना सहज दूध विकता येईल या साठी नायगावला दूध शीतकरण केंद्र सुरू केले. 

मावळात मुबलक पाऊस पडतो, धरणे शंभर टक्के भरलेली असतात, शेती या मुख्य व्यवसायाला दूध उत्पादनांची जोड आहे. त्यामुळे आजही खेडोपाडी दूध उत्पादक गवळी आहे. हे हेरून कार्पोरेट जगतातील नामवंत कंपन्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. गुजरात राज्यातील एकमेक बॅण्ड असलेल्या अमूलनीही गावोगावी दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. दूधाची गुणवत्ता व प्रतवारी प्रमाणे ते दूधाला भाव देत आहेत.अशाच आणखी एका दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्या डेअरी फार्मरने येथे दूध संकलन केंद्र केले आहे. टाटा पाॅवरने ए. एल. सी. इंडिया या कंपनीला सोबत घेऊन आंदर मावळातील ४० गावातील १ हजार महिलांना सोबत घेऊन दूध कंपनीची स्थापना केली. या कंपनीची नुकतीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या कंपनीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पशुखाद्य, चारा,आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. संकलन केलेल्या दूधावर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करीत मावळाचा बॅण्ड जगाच्या स्पर्धेत पुढे आणला जाणार आहे. 

जिल्हा संघ, अमूल, खाजगी खरीदीदार किंवा मावळ दूध कंपनी कोणीही स्वतःच्या नफ्यातील अधिकचा वाटा दूध उत्पादक शेतक-याच्या पदरात टाकणार नाही. प्रत्येक जण दूध खरेदीत दूधाची प्रत गुणवत्ता याची कारणे पुढे करीत कमी अधिक फरकाने दूधाची खरेदी करतोय. उत्पादकही प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे याची दखल घेत दूध विक्री करताना दिसतोय.

पूर्वी दूध खरेदीवर फक्त जिल्हा दूध संघाचे या परिसरावर वर्चस्व होते,शेतकऱ्यांनाही एकच मार्ग होता. आता वेगवेगळे पर्याय झाले खरे,त्यात दूध खरेदीची स्पर्धा वाढली असली तरी गवळयांचा अनुभव मात्र सगळीकडे सारखाच आहे. कारण सगळे एकाच माळेचे मणी आहे.

Web Title: Pune news milk storage in Maval