'प्रश्‍न उपस्थित करणे हा चित्रपटांचा उद्देश '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - ""आपण चित्रपट का बनवतो? मनोरंजनासाठी; पण मनोरंजन म्हणजे चित्रपट नव्हे. चित्रपट हे "इंगेजमेंट' असते. समाज, देश, विचार यात गुंतण्याची एक प्रक्रिया असते, त्यामुळे आपण चित्रपटांतून उत्तरे सांगण्यापेक्षा प्रश्‍न उपस्थित केले पाहिजेत. मग ते तात्त्विक पातळीवरचे असतील किंवा सामाजिक...'' चित्रपटांचा उद्देश आपल्या सहज-सोप्या शब्दांतून सांगत होते ख्यातनाम कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली. 

पुणे - ""आपण चित्रपट का बनवतो? मनोरंजनासाठी; पण मनोरंजन म्हणजे चित्रपट नव्हे. चित्रपट हे "इंगेजमेंट' असते. समाज, देश, विचार यात गुंतण्याची एक प्रक्रिया असते, त्यामुळे आपण चित्रपटांतून उत्तरे सांगण्यापेक्षा प्रश्‍न उपस्थित केले पाहिजेत. मग ते तात्त्विक पातळीवरचे असतील किंवा सामाजिक...'' चित्रपटांचा उद्देश आपल्या सहज-सोप्या शब्दांतून सांगत होते ख्यातनाम कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली. 

एकट्याने चार "सुवर्णकमळ' मिळवलेले कासारवल्ली यांना आशियाई चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते "झेनिथ एशिया सन्मान' प्रदान करण्यात आला. त्यानंतर कासारवल्ली यांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. आशय फिल्म क्‍लब आयोजित या महोत्सवात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) संचालक भूपेंद्र कॅंथोला, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, मिलिंद लेले, "आशय'चे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. 

कासारवल्ली म्हणाले, ""प्रत्येक समाजाचे स्वतःचे प्रश्‍न असतात; परंतु प्रश्‍न विचारायचे नाहीत, असे आपल्याला शिकविले आहे. आपणही तेच करीत राहतो. कलाकृतीने समाजात जी वास्तव स्थिती आहे, ती मांडली पाहिजे. कलेचा उद्देश उत्तरे सांगणे हा नसावा. प्रश्न उपस्थित करणे हा असावा.'' भावे म्हणाल्या, ""खऱ्या माणसांचा चित्रपट बनवणारे सत्यजित राय हे एकटे नाहीत, हे मला कासारवल्ली यांचे चित्रपट पाहिल्यानंतर कळले. त्यांच्या चित्रपटांमुळे "असा चित्रपट बनवता आला पाहिजे', असे वाटत राहते.'' सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. 

पॉपकॉर्न खात आणि कोक पीत चित्रपट पाहणे यापेक्षा चित्रपटाचा मोठा अपमान दुसरा कुठलाही नाही. अशी संस्कृती मिटवत चित्रपट साक्षरता वाढवण्याचे काम चित्रपट महोत्सवातून होत आहे आणि होत राहावे. 
- भूपेंद्र कॅंथोला, संचालक, एफटीआयआय 

मी अर्धा महाराष्ट्रीयन 
मी मूळचा कर्नाटकचा असलो तरी अर्धा महाराष्ट्रीयन आहे. कारण सासरे महाराष्ट्रातील आहेत. माझे शिक्षण पुण्यातच "एफटीआयआय'मध्ये झाले आहे. कलाकार म्हणून घडू शकलो, एक आकार मिळाला, तो इथल्या वास्तव्यामुळेच, अशा भावना व्यक्त करून कासारवल्ली म्हणाले, ""शिक्षणानिमित्ताने पुण्यात काही वर्षे राहिलो असलो, तरी मराठी शिकण्याची संधी मिळाली नाही. मला मराठीतील दोनच वाक्‍ये येतात - ती म्हणजे इथल्या बसमध्ये सतत ऐकू येणारे "पुढे सरका' आणि जागोजागी लिहिलेले "येथे थुंकू नका.'''

Web Title: pune news movie entertainment Girish Kasaravalli