पुणे शहर मल्टिप्लेक्‍समय

पुणे शहर मल्टिप्लेक्‍समय

पुणे - ‘मल्टिप्लेक्‍स’ला जाऊन चित्रपट पाहायचा, हे ‘कल्चर’ पुण्यात वाढत आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍स’च्या संख्येत गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढ झाली आहे. ‘मल्टिप्लेक्‍स’मधील ‘स्क्रीन’नेही आता शंभरी ओलांडली आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍सचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख तयार होऊ लागली आहे.

पुण्यात ३२ एकपडदा चित्रपटगृह होते. त्यामुळे ‘चित्रपटगृहांचे शहर’ म्हणून पुण्याला ओळखले जायचे; पण वेगवेगळ्या कारणांमुळे एकपडदा चित्रपटगृहांची संख्या कमी होत गेली, तर ‘मल्टिप्लेक्‍स’ची संख्या वाढत गेली. मागील आठवड्यात सेनापती बापट रस्ता, शंकरशेठ रस्ता परिसरात दोन नव्या ‘मल्टिप्लेक्‍स’ची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यात सध्या १६ मल्टिप्लेक्‍स झाले आहेत, तर पिंपरी-चिंचवडमधील ‘मल्टिप्लेक्‍स’ची संख्या अकरावर पोचली आहे. त्यामुळे एखादा चित्रपट एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील २७ ‘मल्टिप्लेक्‍स’मधील १३३ स्क्रीनवर झळकू शकतो, अशी सुविधा तयार झाली आहे.

शहर चहूबाजूने वाढत आहे. त्या त्या भागातील प्रेक्षकांना आपल्याच परिसरात मनोरंजनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून शहरातील नाट्यगृहांची संख्या वाढविण्यात आली. त्यापद्धतीने प्रेक्षकांची गरज लक्षात घेऊन शहरातील ‘मल्टिप्लेक्‍स’ची संख्या वाढली आहे. सध्या शहरात, विशेषत: उपनगरात ‘मल्टिप्लेक्‍स’ वाढले आहेत. त्यामुळे जवळ जवळ सर्वच भागांत मल्टिप्लेक्‍स पाहायला मिळत आहेत. येथील स्वच्छता, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, विविध वस्तूंची विक्री, पुस्तकांची दालने, हॉटेल या गोष्टींमुळे ‘मल्टिप्लेक्‍स’कडे कल वाढत आहे, असे निरीक्षण काही ‘मल्टिप्लेक्‍स’ चालकांनी नोंदवले आहे.

मुंबईत जवळपास ४५ मल्टिप्लेक्‍स आहेत; पण लोकसंख्येनुसार पाहायला गेले तर मुंबईपेक्षा पुण्यातील ‘मल्टिप्लेक्‍स’ची संख्या सध्या जास्त आहे. त्यामुळे आता पुण्यात आणखी नव्या ‘मल्टिप्लेक्‍स’ची आवश्‍यकता नाही. वर्षभरात ५ ते ६ मल्टिप्लेक्‍स पुण्यात आले आहेत; पण त्यांची तयारी गेल्या ७-८ वर्षांपासून होती. त्यामुळे पुढील दोन वर्षांत नवे मल्टिप्लेक्‍स येतील, असे वाटत नाही. 
- अरविंद चाफळकर, संचालक, सिटी प्राइड

पुण्यात मल्टिप्लेक्‍स २७

सिंगल स्क्रीन १६

एक चित्रपट एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील २७ ‘मल्टिप्लेक्‍स’मधील १३३ स्क्रीनवर झळकतो

विविध वस्तूंची विक्री, पुस्तकांची दालने, हॉटेल या गोष्टींमुळे ‘मल्टिप्लेक्‍स’कडे कल.

‘एकपडदा’चा नियम बदलावा
एकपडदा चित्रपटगृहांची संख्या ३२ वरून १६ वर आली आहे. सरकारच्या नियमानुसार एकपडदा चित्रपटगृह पूर्ण बंद करून तेथे दुसरा व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यामुळे शहरातील काही एकपडदा चित्रपटगृह केवळ नावालाच चालू स्थितीत आहेत. या गोष्टीचा विचार करून सरकारने आपले नियम बदलावेत आणि चित्रपटगृहाच्या ठिकाणी अन्य व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एकपदडा चित्रपट संघटनेचे अध्यक्ष सदानंद मोहोळ यांनी केली. एकाच ठिकाणी असलेल्या मॉल, हॉटेल्सचा ‘मल्टिप्लेक्‍स’ला फायदा होतो. असा फायदा एकपडदा चित्रपटगृहाला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com