पोटचा मुलगाच बनला आई-वडिलांचा कर्दनकाळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे -दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आई- वडिलांचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खून केल्यानंतर मुलाने हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार पेठेतील पाटे हाइट्‌स इमारतीत हा प्रकार घडला. 

प्रकाश दत्तात्रेय क्षीरसागर (वय 60) आणि पत्नी आशा क्षीरसागर (वय 55, दोघे रा. पाटे हाइट्‌स, शनिवार पेठ, पुणे) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर, पराग क्षीरसागर (वय 30) असे त्या मुलाचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, ससून रुग्णालयात दाखल केले आहे. 

प्रकाश क्षीरसागर हे बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. परंतु कंपनीने त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यांच्या पत्नी आशा कॅम्पमध्ये शिक्षण विभागात अधीक्षिका म्हणून कार्यरत होत्या. क्षीरसागर दांपत्य मुलांसह पाटे हाइट्‌स इमारतीत तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहत असे. या दांपत्याला पराग आणि प्रतीक अशी दोन जुळी मुले आहेत. आरोपी परागचे अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण झाले आहे. परंतु, तो बेरोजगार होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. तर, लहान भाऊ प्रतीक हा विवाहित असून, खासगी कंपनीत नोकरीस आहे. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर क्षीरसागर कुटुंबीय झोपी गेले. पराग हा आई- वडिलांना नेहमी त्रास देत असे. त्याने मध्यरात्री अडीचच्या सुमारास वडिलांसोबत वाद घातला. या भांडणात परागने गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून वडिलांचा खून केला. आईने विरोध केला असता त्याने आईचा गळा आवळून खून केला. 

दरम्यान, बुधवारी सकाळी सासू- सासरे झोपेतून जागे न झाल्यामुळे प्रतीकच्या पत्नीने बेडरूममध्ये डोकावून पाहिले. त्या वेळी सासरे प्रकाश आणि सासू आशा यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. तिने पतीला हा प्रकार सांगितला. त्यावर प्रतीकने भाऊ पराग याच्याकडे विचारणा केली व विश्रामबाग पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे आणि विश्रामबागचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी रक्‍ताने माखलेला चाकू आढळला आहे. 

स्वतःच्या हातावर वार 
या घटनेनंतर परागने किचनमध्ये स्वतःच्या हातावर वार करून घेतले. त्यात बराच रक्तस्राव झाला होता. परागला चक्‍कर आल्यामुळे भावाने त्याला सोफ्यावर झोपविले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

शनिवार पेठेत बुधवारी पहाटे अडीच ते सकाळी नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. वडिलांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत, तर आईचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मुलगा पराग याने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त 

Web Title: pune news murder