खुनातील आरोपीचे धागेदोरे मिळेनात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - वडगाव परिसरात अडीच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीचे धागेदोरे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. दुसऱ्या दिवशी आरोपींच्या शोधासाठी पाच पथके नेमण्यात आली असून, आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.

पुणे - वडगाव परिसरात अडीच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीचे धागेदोरे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. दुसऱ्या दिवशी आरोपींच्या शोधासाठी पाच पथके नेमण्यात आली असून, आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.

वडगाव खुर्द परिसरात आई-वडिलांजवळ घरात झोपलेल्या श्रुती विजय शिवनगे या बालिकेचे शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अपहरण केले. त्यानंतर आरोपीने घरापासून काही अंतरावर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून केला होता. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अपहरण, खून आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवनगे कुटुंबीय हे मूळचे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यातील आहे. हे दांपत्य धायरी येथील एका व्यावसायिकाकडे भाजीपाला पॅकिंगचे काम करत होते. ते यापूर्वी तळेगाव दाभाडे येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामास होते. त्यानंतर ते गावी गेले होते. दोन महिन्यांपूर्वी ते पुन्हा रोजगारानिमित्त धायरी येथे परतले होते. येथील कुदळे लगड मळा येथील एका इमारतीमध्ये ते भाडेतत्त्वावर राहत होते.

दरम्यान, मध्यरात्री आरोपीने घराचा आतून लावलेला दरवाजाचा कडीकोयंडा उघडून प्रवेश केला. तेथे झोपेत असलेल्या बालिकेला उचलून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, गळा दाबून खून केल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

विविध शक्‍यता गृहीत धरून तपास
या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेसह पाच पथके आरोपीच्या मागावर आहेत. या परिसरातील संशयित आणि नातेवाइकांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. एखाद्या कामगाराने दारूच्या नशेत हे कृत्य केले असावे, तसेच एखाद्या नातेवाइकाकडून किंवा पूर्ववैमनस्यातून बदला घेण्यासाठी हा खून केल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. विविध शक्‍यता गृहीत धरून तपास करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: pune news murder case inquiry