मनाला शांतता देणारे संगीत ठरतेय "आजारावरचे रामबाण औषध'ही 

सुशांत सांगवे
बुधवार, 21 जून 2017

पुणे - तुम्ही निराश झाला आहात... ताणतणाव वाढलाय... मानसिक अस्वस्थताही वाढलीय... सांधेदुखी सुरू झाली आहे... हृदयविकारामुळे बेचैन आहात... अशा वेळीच नव्हे तर वेगवेगळे आजार सुधारित राग ऐकून आटोक्‍यात आणता येऊ शकतात. त्यामुळे एरवी मनाला शांतता देणारे संगीत "आजारावरचे रामबाण औषध' म्हणूनही स्वीकारले जाताना दिसत आहे. 

पुणे - तुम्ही निराश झाला आहात... ताणतणाव वाढलाय... मानसिक अस्वस्थताही वाढलीय... सांधेदुखी सुरू झाली आहे... हृदयविकारामुळे बेचैन आहात... अशा वेळीच नव्हे तर वेगवेगळे आजार सुधारित राग ऐकून आटोक्‍यात आणता येऊ शकतात. त्यामुळे एरवी मनाला शांतता देणारे संगीत "आजारावरचे रामबाण औषध' म्हणूनही स्वीकारले जाताना दिसत आहे. 

आजारी पडल्यानंतर वेगवेगळ्या उपचार पद्धती अंगिकारल्या जातात. त्यात आता संगीतोपचार पद्धतीचा अवलंब हळूहळू वाढू लागला आहे, असे निरीक्षण सतारवादक पं. शशांक कट्टी यांनी नोंदवले आहे. पं. कट्टी काही वर्षांपासून संगीतोपचार पद्धतीवर अभ्यास करत आहेत. शिवाय, रुग्णांवर उपचारही करतात. मन:शांततेबरोबरच शरीराच्या फायद्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर वाढला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. 

कट्टी म्हणाले, ""आपण आनंदी असतो त्या वेळी आनंद वाढवणारे संगीत आपल्याला आवडते. तसेच दु:खाच्या प्रसंगाचेही आहे. म्हणून मन:स्थितीचा (मूड) आणि संगीताचा जवळचा संबंध आहे. वेगवेगळ्या वेळेनुसार आणि प्रसंगानुसार मन:स्थिती बदलत जात असते. त्यामुळे वेळ आणि प्रसंग पाहून विशिष्ट प्रकारचे सुधारित राग ऐकले की, समोरच्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. आजारपण आटोक्‍यात येऊ शकते. यासाठी सुरांचे ज्ञान असलेच पाहिजे, असे बंधन नाही; पण ही उपचारपद्धती घेताना काही "पथ्य' पाळली तरच त्याचा उपयोग होतो.'' व्यक्‍तीचा आजार, त्याच्याकडे असलेला उपलब्ध वेळ हे पाहून सुधारित राग तयार केले जातात. ते विशिष्ट वातावरणात ऐकवले जातात, असेही त्यांनी सांगितले. 

""संगीत हे शरीर, मन आणि बुद्धी याच्याशी संबंधित आहे. सर्वस्व विसरायला लावण्याची ताकद संगीतात आहे. खरं तर ही संगीतातील परमोच्च "स्टेप'च मानली पाहिजे. यामुळे मानसिक आनंद तर मिळतोच. शिवाय, कितीही ताण असो तो निघून जातो. दु:खातून, आजारातून सुटका होते; पण त्यासाठी संगीतातून आनंद घेता आला पाहिजे.'' 
- पद्मा तळवलकर (ज्येष्ठ गायिका) 

""मानसिक ताणतणावातून मुक्त होण्यासाठी संगीतासारखा दुसरा चांगला उपाय नाही. हल्लीच्या धावत्या युगात ताणतणाव वाढत आहेत. आजारही वाढत आहेत. त्यामुळे आवडणारे संगीत ऐकलेच पाहिजे. संगीत ही अशी एकमेव गोष्ट आहे की, प्रत्येकाला ती आनंद देऊन जाते. संगीताला भाषेचे बंधन नाही.'' 
- आनंद भाटे (गायक) 

Web Title: pune news music day health