लॅपटॉपच्या गैरव्यवहारप्रकरणी 'बार्टी'तील अधिकाऱ्याला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) या संस्थेतील प्रकल्प अधिकाऱ्याला 103 लॅपटॉपच्या अपहारप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) या संस्थेतील प्रकल्प अधिकाऱ्याला 103 लॅपटॉपच्या अपहारप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

या प्रकरणी सविता नलावडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल सिद्धार्थ रणवीर (रा. भेकराईनगर, हडपसर) या प्रकल्प अधिकाऱ्याला अटक केली आहे. हा अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा जानेवारी 2015 ते जानेवारी 2017 या कालावधीत घडला. रणवीर हा बार्टी या संस्थेत कंत्राटी पद्धतीने प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत होता. या संस्थेत प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांना सरकारने 103 लॅपटॉप उपलब्ध करून दिले होते. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना विविध क्षेत्रात आणि पीएच.डी.करिता निवड झालेल्यांना हे लॅपटॉप उपलब्ध करून दिले जातात. हे सर्व लॅपटॉप रणवीर याच्या ताब्यात होते. त्याने हे लॅपटॉप गरजू विद्यार्थ्यांना न देता अपहार केला. याची किंमत सुमारे 51 लाख 68 हजार रुपये इतकी आहे.

हा गुन्हा घडल्यापासून तो पसार झाला होता. या गुन्ह्यात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. तो जिल्हा आणि उच्च न्यायालयाने अमान्य केला. त्यानंतर आरोपी हडपसर न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले. आरोपीने लॅपटॉप कोणाला दिले, कोणास विकले, त्याचे साथीदार कोण, गुन्हा घडल्यापासून तो कोठे वास्तव्यास होता, लॅपटॉप नेण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करायचे आहे, त्याने सरकारची फसवणूक केली असल्याने या गुन्ह्याच्या तपासाकरिता आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

Web Title: pune news officer custody for laptop scam case