‘डे केअर सेंटर’मुळे ज्येष्ठांची एकटेपणातून मुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे - नोकरी, व्यवसायामुळे अनेकांना घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही किंवा दिवसभर घरात एकटे असल्यामुळे ज्येष्ठांमध्येच एकलकोंडेपणाची भावना जागृत होते. परिणामी त्यातून सतत कसली तरी भीती वाटू लागते. ज्येष्ठांना या एकटेपणातून मुक्त करण्यासाठी ‘डे केअर सेंटर’चा आधार मिळू लागला आहे.

पुणे - नोकरी, व्यवसायामुळे अनेकांना घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही किंवा दिवसभर घरात एकटे असल्यामुळे ज्येष्ठांमध्येच एकलकोंडेपणाची भावना जागृत होते. परिणामी त्यातून सतत कसली तरी भीती वाटू लागते. ज्येष्ठांना या एकटेपणातून मुक्त करण्यासाठी ‘डे केअर सेंटर’चा आधार मिळू लागला आहे.

सर्वसाधारणपणे ‘डे केअर सेंटर’ म्हटले, की लहानमुलांसाठीचे पाळणाघर डोळ्यासमोर येते. ‘डे केअर’ची संकल्पना लहान मुलांपुरती मर्यादित न राहता आता ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘डे केअर’ सुरू झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सेंटर फॉर ॲक्‍शन, रिसर्च अँड एज्युकेशन (केअर) या संस्थेतर्फे भुसारी कॉलनी परिसरात ‘रेनबो’ हे ‘डे केअर सेंटर’ ऑक्‍टोबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. याबाबत फारशी जागरूकता नसल्याने सुरवातीला या केंद्रास अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. आता वीसहून अधिक ज्येष्ठ नागरिक येथे आहेत.

घरातील इतर मंडळी नोकरी किंवा व्यवसायामुळे दिवसभर घराबाहेर असतात. अशा वेळी घरात एकटे वावरताना ज्येष्ठांना प्रकृतीची काळजी वाटत असते. एकटे राहून त्यांच्या मनाचा कोंडमारा होतो. त्यामुळे सतत कसली तरी भीती वाटत असते. अशावेळी ज्येष्ठांसाठी ‘डे केअर सेंटर’ फायदेशीर ठरत आहे.

संस्थेच्या मुख्य विश्‍वस्त अनुराधा करकरे म्हणाल्या, ‘‘दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात ज्येष्ठ मंडळी केंद्रात असतात. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी एका मोठ्या शब्दांमधून लहान-लहान अर्थपूर्ण शब्द तयार करणे, प्रार्थना, गाणी म्हणणे, म्हणी व वाक्‍यप्रचार ओळखणे, प्राणायाम, हलके व्यायाम, मेंदूला चालना देणारे खेळ यावर भर दिला आहे. साधारणपणे ६५ वर्षांपुढील नागरिक केंद्रात आहेत. छोटेखानी ग्रंथालय, दूरचित्रवाणी संच याबरोबरच कॅरम, पत्ते, बुद्धिबळ असे विविध खेळ येथे उपलब्ध आहेत. काही ज्येष्ठांना ठरावीक वेळी औषधे घ्यावी लागत असल्याने वैद्यकीय सल्लागारांच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जाते.’’

शहरात या प्रकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन ते चार ‘डे केअर सेंटर्स’ कार्यरत आहेत. या केंद्रांमुळे ज्येष्ठांना आधार मिळत असून, त्यांचा एकलकोंडेपणा कमी होत असल्याचे निरीक्षणही वृद्धांनी नोंदविले आहे.

पाश्‍चिमात्य देशांत विशेषकरून युरोप, अमेरिकेत अशा प्रकारची ‘डे केअर सेंटर्स’ कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानांनी सज्ज अशी केंद्रे परदेशात असताना आपल्याकडेदेखील ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविता येईल, या उद्देशाने आम्ही हे केंद्र सुरू केले आहे.
- अनुराधा करकरे, मुख्य विश्‍वस्त, केअर संस्था

Web Title: pune news old people day care center