संकेतस्थळावरील त्रुटीचा विद्यार्थ्यांना फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील त्रुटीमुळे सुमारे सातशे विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग म्हणजे पसंतीक्रम भरता आलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये सुधारणा करून त्यांचा अर्ज भरण्याची व्यवस्था केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केली आहे. 

पुणे - अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील त्रुटीमुळे सुमारे सातशे विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग म्हणजे पसंतीक्रम भरता आलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये सुधारणा करून त्यांचा अर्ज भरण्याची व्यवस्था केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केली आहे. 

प्रवेश अर्जाचा भाग भरताना विद्यार्थ्याने त्याचा बैठक क्रमांक टाकल्यास राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्याच्या गुणाचा तपशील आपोआप भरला जाणार होता. बैठक क्रमांकाची सुरवात "सी शून्य' अशी सुरू होते; परंतु अनेकांनी "सी ओ' अशी सुरवात करून त्यापुढे बैठक क्रमांक टाकला. "शून्य' आणि "ओ' यांतील फरक ओळखण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये नसल्याने संगणकाने चुकीच्या "सीओ' अक्षरांचा स्वीकार केला; पण त्यांचे गुण शून्य दाखविण्यात आले. शून्य गुण मिळालेले विद्यार्थी हे अनुत्तीर्ण ठरत असल्याने त्यांना अर्जाचा भाग दोन भरता आलेला नाही. या अडचणीचा सामना सुमारे 700 विद्यार्थ्यांना करावा लागला. त्यांची यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने तयार केली आहे. ती प्रवेशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही अचडण आली आहे, त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा केली जाणार आहे; तसेच त्यांना भाग दोन भरण्याची व्यवस्था हडपसर येथील एस. एम. जोशी कनिष्ठ महाविद्यालय, विभागीय झोन केंद्र आणि मार्गदर्शन केंद्रांवर करण्यात आली आहे. 

सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ""ज्यांना नव्याने अर्ज भरायचा आहे, ज्यांना गुण शून्य आल्याने अर्ज भरता आला नाही; तसेच अन्य कारणाने ज्यांचे अर्ज अपूर्ण राहिले आहे, त्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता.29) सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज भरता येतील. हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालय; तसेच पुणे मनपा व पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील झोन केंद्र व मार्गदर्शन केंद्रात अर्ज भरता येईल; तसेच अर्ज अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी सकाळी संकेतस्थळावर पाहता येईल. अर्जाचा क्रमांक, बैठक क्रमांक वा नाव टाकून यादीत नाव शोधता येईल. ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना समितीकडून एसएमएसदेखील पाठविले जाणार आहेत.'' 

प्रणालीत सुधारणा करणार 
विद्यार्थ्यांना चुकीचा बैठक क्रमांक टाकल्याने त्याचे गुण "शून्य' दाखविले गेले आहे; परंतु पुढील फेऱ्यांमध्ये नव्याने अर्ज भरताना हा प्रश्‍न उद्‌भवणार नाही. कारण चुकीचा बैठक क्रमांकाचा संगणक स्वीकार करणार नाही. एखाद्याने चुकीचा क्रमांक टाकल्यास तसा संदेश संगणकावर दिसेल, असा बदल प्रणालीत केला जाईल, असे मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

Web Title: pune news online admission student