गणेश मंडळ मंडप, कमानींच्या 'ऑनलाइन' परवानगीला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या मंडप, कमानींना परवानगी देण्यास महापालिकेने सुरवात केली असून, यंदा पहिल्यांदाच ही परवानगी "ऑनलाइन' देण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू केली आहे. 22 ऑगस्टपर्यंतच परवानगी देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, या कालावधीत दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत परवानगी देण्यात येईल.

गणेशोत्सव येत्या 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. तीत मंडप, कमानी, "रनिंग' मंडपाला ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात परवानगी देण्याचे धोरण ठरविण्यात आले होते. त्यानुसार परवानगी देण्यास सुरवात केली आहे.

याबाबतचा आदेश महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढला आहे.
वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या धोरणानुसारच सहायक आयुक्तांच्या परवानगीने मंडळांना कमानी उभारता येतील. या परवानग्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा अहवाल अतिक्रमण विभागाला रोज सादर करावा लागणार आहे. बेकायदा मंडप वा कमानी उभारल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: pune news online permission mandap & kaman