‘यलो फीव्हर’वरील लसीसाठी ‘ऑनलाइन’ वेळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पुणे - ससून रुग्णालयात यलो फीव्हर प्रतिबंधात्मक लस घेण्याची वेळ आता ‘ऑनलाइन’ मिळेल, अशी व्यवस्था नव्याने सुरू केली आहे. ऑनलाइन पद्धतीने वेळ देण्याचा आणि त्याचे शुल्कही भरण्याचा राज्यातील सरकारी रुग्णालयातील हा पहिला प्रयोग आहे. 

पुणे - ससून रुग्णालयात यलो फीव्हर प्रतिबंधात्मक लस घेण्याची वेळ आता ‘ऑनलाइन’ मिळेल, अशी व्यवस्था नव्याने सुरू केली आहे. ऑनलाइन पद्धतीने वेळ देण्याचा आणि त्याचे शुल्कही भरण्याचा राज्यातील सरकारी रुग्णालयातील हा पहिला प्रयोग आहे. 

ब्राझील, युंगाडा, अर्जेंटिना, नायजेरिया, युथोपिया अशा देशांमध्ये यलो फीव्हर हा आजार आहे. भारतात मात्र हा आजार पसरविणारा विषाणूंचा संसर्ग झालेला नाही. अशा देशांमधून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून यलो फीव्हरचे जंतू भारतात पसरण्याचा धोका असतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी अशा देशांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना यलो फीव्हरची लस दिली जाते. पुण्यात ससून रुग्णालयात ही लस देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, ही लस घेण्यासाठी परदेशात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने येत होते. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थेवर याचा ताण पडत होता. यातून मार्ग काढण्यासाठी ससून रुग्णालयाने यलो फीव्हर लस घेण्याची वेळ घेण्याची ‘ऑनलाइन’ व्यवस्था सुरू केली आहे. 

या बाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयातून एका आठवड्यात सुमारे दीडशे नागरिकांना यलो फीव्हरची लस दिली जाते. त्यासाठी मोठी रांग येथे सकाळपासूनच लागलेली असे. काही रुग्णांना त्यामुळे परत येण्याची विनंती करावी लागत होती. ही व्यवस्था बदलण्यासाठी ही ‘ऑनलाइन’ व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. यातून लसची शुल्कही ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.’’

पुणे हे जगाच्या नकाशावर माहिती तंत्रज्ञान शहर म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा पूर्ण क्षमतेने वापर करून रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्याचा हा प्रयत्न आहे. यलो फिव्हरच्या लसीसाठी वेळ घेण्याच्या ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे. त्यातून रुग्णालयाची प्रतिमाही सुधारेल.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

ससून रुग्णालयाचे आवाहन
यलो फीव्हर लसी घेण्याची वेळ घेण्यासाठी www.yellowfeverbjgmc.org या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन ससून, रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पासपोर्ट सेवा सुविधा केंद्राच्या धर्तीवर ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत ही लस ससून रुग्णालयात देण्यात येईल. दिवसभरातून ५० रुग्णांना ही लस देण्याची सुविधा येथे केली आहे. 

Web Title: pune news online time for yellow fever vaccine